पैसे नसतानाही कॅमेरॉन ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सची पहिली बोली; आकाश अंबानींचं कारण ऐकून कराल सॅल्यूट!
आयपीएल 2026 चा लिलाव अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन सर्वाधिक चर्चेत राहिला. कॅमेरॉन ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 25.20 कोटी रुपयांना खरेदी केलं. त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. विशेष म्हणजे ग्रीनची मूळ किंमत केवळ 2 कोटी रुपये होती. याआधी 2023 मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 17.50 कोटी रुपयांमध्ये संघात सामील करून घेतलं होतं.
कॅमेरॉन ग्रीनचा आयपीएल प्रवास मुंबई इंडियन्सकडूनच सुरू झाला होता. अवघ्या 26 व्या वर्षी ग्रीनने मुंबईकडून खेळताना आपली वेगळी छाप पाडली होती. पदार्पणाच्या हंगामात त्याने 16 सामन्यांत 452 धावा केल्या, तर गोलंदाजीतही 6 विकेट्स घेत संघाला मोलाची मदत केली. 2024 मध्ये तो आरसीबीकडे गेला. त्या हंगामात त्याने 13 सामन्यांत 255 धावा केल्या आणि 10 विकेट्स पटकावल्या. आता कोलकाता नाईट रायडर्स हा ग्रीनचा आयपीएलमधील तिसरा संघ ठरला आहे.
लिलावात सर्वांचे लक्ष वेधलं ते मुंबई इंडियन्सच्या पहिल्या बोलीने. यंदा मुंबई इंडियन्स लिलावात अत्यंत कमी पर्ससह उतरली होती. लिलावापूर्वी ट्रेड डीलद्वारे तीन खेळाडूंना संघात सामील करताना मुंबईने 17 खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामुळे लिलावाच्या वेळी त्यांच्या पर्समध्ये 3 कोटी रुपयांपेक्षाही कमी रक्कम शिल्लक होती. अशा परिस्थितीत कॅमेरॉन ग्रीनवर मुंबईने पहिली बोली लावल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
या कृतीमागचं कारण मुंबई इंडियन्सचे संघमालक आकाश अंबानी यांनी स्पष्ट केलं. ग्रीन हा केवळ उत्तम खेळाडूच नाही, तर एक चांगला माणूस असल्याचं त्यांनी सांगितलं. “कॅमेरॉन ग्रीनला आम्ही विकत घेऊ शकणार नाही, याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. मात्र त्याच्याविषयी असलेला आदर आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठीच आम्ही पहिली बोली लावली,” असं आकाश अंबानी म्हणाले. मुंबई इंडियन्ससाठी ही कृती केवळ बोली नव्हे, तर संघसंस्कृतीचं प्रतीक ठरली.
Comments are closed.