सरकारने माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अंबादास दानवे यांची मागणी

शासकीय कोट्यातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यांना कोणत्याहबी क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. असे असतानाही अद्याप सरकारने त्याचा राजीनामा घेतलेला नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.

कायद्यासमोर सर्व सामान आहेत, हे जर या सरकारला मान्य असेल तर सरकारने माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा. सरकारने यापूर्वी जो न्याय राहुल गांधी यांच्या खासदारकी आणि सुनील केदार यांच्या आमदारकीसाठी लावला, तोच न्याय माणिकराव कोकाटे यांना लागू व्हायला हवा. सरकार निर्लज्जपणे जर हायकोर्टाच्या कामकाजाची वाट पाहत असेल तर हा संविधान द्रोह आहे, हे सुर्यप्रकाशाप्रमाणे स्वछ आहे“, असे अंबादास दानवे म्हणाले.

नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर या उच्चभ्रू भागात 1995 ते 1997 दरम्यान माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय यांनी शासनाच्या दहा टक्के कोटय़ातील सदनिका अल्प उत्पन्न गटातून घेतल्या होत्या. यावर आक्षेप घेत माजी मंत्री स्वर्गीय तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या अॅड. अंजली दिघोळे राठोड या प्रकरणात तक्रारदार आहेत. अल्प उत्पन्न असल्याचे आणि दुसरे घर नसल्याच्या खोटय़ा माहितीची कागदपत्रे दिल्याचे समोर आले. 20 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने या घोटाळ्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय यांना प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा व पन्नास हजारांचा दंड ठोठावला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आणि दंडाची रक्कम दहा हजार रुपये केली. यामुळे कोकाटे यांचे मंत्रीपद व आमदारकी धोक्यात आली आहे.

Comments are closed.