रत्नागिरीतील मिरजोळेत बिबट्याचा चार गुरांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरजोळे येथील सोनारवाडी भागातील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरांना ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
हि गुरे जंगलात चरण्यासाठी सोडलेले असताना बिबट्याने हल्ला केला. एकाच ठिकाणी चार गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी आणि मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत रत्नदीप पाटील यांनी तत्काळ वनविभागाला याची खबर दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मिरजोळे आणि शिळ या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला आहे. येथे अनेकदा गुरे, शेळ्या आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. कुत्र्यांची शिकार होण्याचे प्रमाण अधिक आहे. आंबा बागायतींमध्ये काम करणाऱ्या गुराख्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याने त्यांच्यातही मोठी भीती आहे. तीन वर्षांपूर्वी गावातील माळरानावर सडलेल्या अवस्थेत एक बिबट्याही आढळून आला होता.
Comments are closed.