'सुरुवातीला नकार, शेवटी CSKचा होकार'; चेन्नईनं सरफराज खानला स्वस्तात घेतलं, संधी मिळताच भावनिक पोस्ट करत म्हणाला ….

भारतीय क्रिकेटमधील मेहनतीचं आणि संयमाचं उत्तम उदाहरण ठरलेल्या सरफराज खानसाठी आयपीएल 2026 मिनी-ऑक्शन एक नवा टर्निंग पॉइंट ठरला आहे. मंगळवारी पार पडलेल्या या लिलावात पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) सरफराज खानला 75 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर आपल्या संघात सामील करून घेतलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सरफराजसाठी ही निवड म्हणजे कष्टाचं फळ मानलं जात आहे.

विशेष म्हणजे, ऑक्शनच्या काही तास आधीच सरफराजने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अफलातून खेळी करत अवघ्या 22 चेंडूत 73 धावा ठोकल्या होत्या. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतरही त्याने संयम सोडला नाही आणि अखेर सीएसकेने सहाव्या फेरीत त्याच्यावर विश्वास दाखवला. हा विश्वास सरफराजसाठी केवळ करार नव्हे, तर करिअरला मिळालेली नवी संधी ठरली आहे.

सीएसकेकडून निवड झाल्यानंतर सरफराजने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने “खूप-खूप धन्यवाद सीएसके, माझ्या करिअरला नवी जिंदगी दिल्याबद्दल” असं म्हणाला. त्याच्या डोळ्यांतील आनंद आणि कृतज्ञता व्हिडिओतून स्पष्टपणे जाणवत होती. 2023 नंतर आयपीएलपासून दूर असलेल्या सरफराजसाठी ही पुनरागमनाची संधी अत्यंत महत्त्वाची आहे. यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 6 डावांत 256 धावा, 64.00 ची सरासरी आणि 182.85 चा स्ट्राइक रेट ठेवत आपली दावेदारी ठामपणे मांडली आहे.

दरम्यान, या मिनी-ऑक्शनमध्ये अनकॅप्ड खेळाडूंनीही इतिहास रचला. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांना सीएसकेने प्रत्येकी 14.20 कोटी रुपयांना खरेदी करत आयपीएलमधील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू बनवलं. याशिवाय, वेस्टइंडीजचा अष्टपैलू अकील हुसेन, अनुभवी गोलंदाज मॅट हेन्री आणि राहुल चहर यांनाही सीएसकेने आपल्या ताफ्यात घेतलं.

मोठ्या ट्रेडमध्ये संजू सॅमसनला 18 कोटी रुपयांना संघात सामील करून घेतल्यानंतर सीएसकेचा संघ अधिक मजबूत झाला आहे. काही दिग्गज खेळाडूंना रिलीज करत नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवणाऱ्या सीएसकेसाठी आयपीएल 2026 हा नवा अध्याय ठरणार आहे.

Comments are closed.