भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षकाचा श्रीलंका संघात प्रवेश, टी20 वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन बनवण्याची मिळाली जबाबदारी!

2014 ते 2021 या काळात भारतीय संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी प्रशिक्षक आर. श्रीधर यांची आता श्रीलंका संघात एन्ट्री झाली आहे. श्रीधर यांची पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपपर्यंत श्रीलंकेचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (Fielding Coach) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीधर यांच्या कार्यकाळात भारतीय संघाच्या ग्राऊंड फील्डिंगमध्ये मोठी सुधारणा पाहायला मिळाली होती. आता ते हीच जबाबदारी श्रीलंका संघासोबत पार पाडताना दिसतील. विशेष म्हणजे, श्रीधर यांनी 2025 च्या सुरुवातीला श्रीलंकेत 10 दिवसांचे विशेष क्षेत्ररक्षण शिबिरही आयोजित केले होते.

टी20 वर्ल्ड कप 2026 च्या साधारण दोन महिने आधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक मोठी खेळी खेळली आहे. श्रीलंका संघाने भारताचे माजी प्रशिक्षक आर. श्रीधर यांची विश्वचषकापर्यंत संघाचे नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (Fielding Coach) म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीलंकाई संघाचे ग्राऊंड फील्डिंग सुधारण्याची मोठी जबाबदारी आता श्रीधर यांच्यावर असेल.

श्रीलंका बोर्डाने श्रीधर यांच्याशी केवळ वर्ल्ड कपपर्यंतचा करार केला आहे. श्रीधर 2014 मध्ये भारतीय संघाशी जोडले गेले होते आणि त्यांनी 2021 पर्यंत आपली सेवा दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा कमालीचा उंचावला होता. ते 300 हून अधिक सामन्यांमध्ये भारतीय संघासोबत होते. श्रीधर आता पाकिस्तान आणि इंग्लंड दौऱ्यापासून श्रीलंका संघासोबतच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करतील.

टी20 वर्ल्ड कप 2026 चे यजमानपद भारत आणि श्रीलंका भूषवणार आहेत. या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार असून पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात लढत होईल. श्रीलंका संघ (8 फेब्रुवारी) रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. श्रीलंकेला ग्रुप-बी मध्ये ठेवण्यात आले असून यामध्ये ओमान, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे या संघांचा समावेश आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना (8 मार्च) रोजी खेळवला जाणार आहे. जर पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये पोहोचला, तर अंतिम सामना श्रीलंकेत होईल. मात्र, पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहोचू शकला नाही, तर अंतिम सामन्याचे यजमानपद भारत भूषवेल.

Comments are closed.