चेन्नईने कॅमेरून ग्रीनला गमावून केली मोठी चूक! लिलावातील चेन्नईच्या रणनीतीवर आर अश्विनकडून प्रश्न उपस्थित
मंगळवारी दुबईत पार पडलेल्या आयपीएल मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनची (Camron green) मोठी चर्चा राहिली. अपेक्षेप्रमाणे त्याच्यावर मोठी बोली लागली आणि कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला 25.20 कोटी रुपयांना खरेदी केले. यासह कॅमेरून ग्रीन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. त्याने स्वतःच्याच देशाच्या मिचेल स्टार्कचा (Mitchell Starc) विक्रम मोडला, ज्याला गेल्या वर्षी केकेआरने 24.75 कोटींना घेतले होते.
जेव्हा बोली 25 कोटींच्या पुढे गेली, तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने (CSK) माघार घेतली. यावर भारताचा अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) भाष्य करताना म्हटले आहे की, चेन्नईने इथे मोठी चूक केली.
अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, आम्ही जो सराव लिलाव (Mock Auction) केला होता, त्यात असे दिसत होते की ग्रीनची किंमत 30 कोटींच्या पुढे जाणार नाही. खरं तर, जर केकेआरने पंजाबसारख्या इतर संघांप्रमाणे थोडा संयम दाखवला असता, तर परिस्थिती वेगळी असती.
अश्विन पुढे म्हणाला, मला असे वाटले की चेन्नईचे व्यवस्थापन त्यांच्या गरजेपेक्षा जास्त बोली लावत होते. सीएसके कॅमेरून ग्रीनला संघात घेण्यासाठी पूर्णपणे ठाम आहे असे वाटले नाही. वैयक्तिकरित्या मला वाटते की, ग्रीन चेन्नईच्या संघात असता तर तो एक उत्तम पर्याय ठरला असता. चेन्नईने ही संधी गमावली आहे.
अश्विनच्या मते, इथे किंमत महत्त्वाची नाही. कॅमेरून ग्रीन हा असा खेळाडू आहे जो पिढीतून एकदाच जन्माला येतो (Once in a generation player). त्याला संघात सामील करून घेणे ही केकेआरसाठी एक मोठी आणि विलक्षण उपलब्धी आहे.
Comments are closed.