पडद्याआडून – भ्रमाचा भोपळा, पुनरुज्जीवनाच्या नादात हरवलेला तोल

>>परागकण खोत

मराठी रंगभूमीवर सध्या पुनरुज्जीवित नाटकांची चलती आहे. जुन्या, गाजलेल्या नाटकांचा पुन्हा आस्वाद घ्यायला प्रेक्षकांना आवडतो, ही वस्तुस्थिती आहे. स्मरणरंजनाच्या ओढीपोटी आचार्य प्र. के. अत्रे यांसारख्या दिग्गज लेखकांची नाटके पुनः पुन्हा रंगमंचावर येतात. ‘लग्नाची बेडी’, ‘मोरूची मावशी’, ‘ब्रह्मचारी’, ‘तो मी नव्हेच’, ‘मी मंत्री झालो’ आणि ‘कवडीचुंबक’ यांसारखी नाटके हजारो प्रयोगांची उंची गाठतात, हे त्यांचे यशच. याच परंपरेतील एक महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘भ्रमाचा भोपळा.’ जवळपास नव्वद वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले, हेच मुळात कौतुकास्पद. मात्र केवळ पुनरुज्जीवन म्हणजे यश, असा भ्रम बाळगण्यात अर्थ नाही.

1935 साली बालमोहन नाटक मंडळींनी सादर केलेले हे चार अंकी संगीत नाटक आजच्या काळात आणावे असे निर्माते संतोष काणेकर आणि श्रीकांत तटकरे यांना वाटले यातच या नाटकाचे यश आहे. नव्या पिढीसाठी ते अधिक सुसंगत व्हावे म्हणून ‘38 कृष्ण व्हिला’ फेम डॉ. श्वेता पेंडसे यांनी मूळ नाटकाची रंगावृत्ती केली असून दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरे यांनी सांभाळली आहे. संजय नार्वेकर, सुनील तावडे, चेतना भट, शुभंकर तावडे यांसारखा लोकप्रिय नटसंचही आहे. एवढं सगळं असूनही नाटकाची म्हणावी तशी भट्टी जमत नाही, ही खंत आहे.

‘भ्रमाचा भोपळा’ हे मुळातच प्रहसनात्मक, फार्सिकल कॉमेडी आहे. तर्काच्या कसोटीवर हे नाटक मोजायचं नाही, असं खुद्द अत्र्यांनीही नमूद केलं आहे. मात्र फार्स म्हणजे तर्काचा संपूर्ण त्याग नव्हे. अतिशयोक्तीची पातळी इतकी वाढवली गेली आहे की, नाटकाचा समतोल ढासळतो. जुन्या अतार्किक गोष्टींना नवे संदर्भ देताना त्यांचे कोपरे घासले गेले नाहीत. परिणामी काही प्रसंग थेट प्रेक्षकांच्या बुद्धीला टोचतात आणि त्यातील विनोद बालिशपणाकडे झुकतो.

कचेश्वर-विद्यागौरी हे प्रौढ जोडपे, त्यांच्या दोन मुली, वेषांतर करून राहणारे प्रियकर, शिकवणीसाठी आलेला वर, येऊ घातलेला जहागीरदार, हरकाम्या नोकर, सचिव नागनाथ आणि त्याची वेडसर मुलगी चित्रा, इतक्या पात्रांची गर्दी तीन तास सांभाळताना नाटकाची दमछाक होते. फार्समध्ये अपेक्षित असलेला ‘समजुतीचा घोटाळा’ आहे, वेषांतरही आहे, पण त्याला तर्काचा किमान आधार हवा असतो. तो इथे वारंवार निसटतो. रंगावृत्ती आणि दिग्दर्शन या दोन्ही पातळ्यांवर लगाम सुटल्याचे जाणवते.

अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींवर प्रहार करणारे हे नाटक आजच्या काळात अधिक धारदार पद्धतीने मांडता आले असते. मात्र जुन्या-नव्याच्या सरमिसळीत गफलत झाली आहे. प्रयोग बांधेसूद वाटत नाही. संवादात होणाऱया वारंवार चुका, पात्रांची नावे चुकणे आणि नंतर त्यावर तत्काळ स्पष्टीकरणाची भर घालणे हे सगळं रसभंग करतं. फक्त गॉगल काढल्यावर पात्र लगेच ओळखलं जाणं किंवा अकारण वेषांतरं ही फार्समध्येही चालून जात नाहीत. त्यामागे ठोस कारणमीमांसा हवीच.

नागनाथ हे नाटकाच्या केंद्रस्थानी असलेले पात्र सगळा पसारा सांभाळताना गोंधळते आणि तो ताण संजय नार्वेकरांच्या देहबोलीत दिसतो. जाफराबादचा जहागीरदार अति-अर्कचित्रात्मक असला तरी त्या कलाकाराने भूमिका सावरली आहे. अरविंद, चित्रा आणि जहागीरदार यांनी आपले बेअरिंग चांगले ठेवले आहे. शुभंकर तावडे आणि वरद चव्हाण ही पुढची पिढी आश्वासक आहे. अर्चना शर्मा यांच्यातही भविष्यकाळाची शक्यता दिसते. वाडय़ाचे नेपथ्य आणि त्यात प्रसंगानुरूप केलेले बदल ही त्यातली जमेची बाजू आहे.

शुभारंभाच्या प्रयोगात झालेल्या चुका टाळून काही दिग्दर्शकीय डावपेच आणि अधिक मेहनत घेतली तर हा प्रयोग नक्कीच प्रभावी होऊ शकतो. अन्यथा केवळ आचार्य अत्र्यांच्या नावावर हा भोपळा चालेल, अशा भ्रमात राहण्यात अर्थ नाही. कारण शेवटी प्रेक्षक नावापेक्षा रंगमंचावरचा अनुभव पाहतो आणि तो इथे अजून फुलायचा आहे.

लेखक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

रंगावृत्ती श्वेता पेंडसे डॉ

दिग्दर्शक विजय केंकरे

कलाकार संजय नार्वेकर, शुभंकर तावडे, चेतना भट, कांचन प्रकाश, वरद चव्हाण, अजिंक्य भोसले, पूजा गोरे, अर्चना शर्मा, अंकित म्हात्रे, आणि सुनील तावडे

निर्माते संतोष काणेकर,

श्रीकांत तटकरे

सादरकर्ता ः कल्पक जोशी

Comments are closed.