Alcohol Fact : दारू प्यायल्यानंतर किती वेळ शरीरात राहतो हँगओव्हर

आजकाल पार्टी, लग्न समारंभ, वाढदिवस किंवा ऑफिस गेट-टुगेदरमध्ये मद्यपान हे सामान्य झालं आहे. अनेकजण फक्त ‘थोडीशी’ दारू घेतात आणि दुसऱ्या दिवशी सर्व काही नॉर्मल असेल असा अंदाज धरतात. मात्र दारूचा परिणाम फक्त त्या काही तासांपुरता मर्यादित नसतो, हे अनेकांना माहितीच नसतं. (how long does alcohol stay in body hangover science)

रात्री पार्टी केल्यानंतर सकाळी ऑफिसला निघताना किंवा गाडी चालवताना अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो. अजूनही शरीरात दारूचे अंश असतील का? हँगओव्हर फक्त डोकं दुखणं किंवा मळमळ एवढाच नसून त्यामागे शरीरात चाललेली प्रक्रिया असते.

दारू शरीरात जाते तेव्हा काय होतं?
एखादी व्यक्ती दारू पिते तेव्हा ती लगेच पचत नाही. पोटात गेल्यानंतर सुमारे 20 टक्के अल्कोहोल थेट पोटातून शोषलं जातं. उर्वरित अल्कोहोल लहान आतड्यातून रक्तात मिसळतं. त्यानंतर रक्ताच्या प्रवाहातून ते यकृतापर्यंत पोहोचतं. यकृत हे शरीराचं मुख्य फिल्टर आहे. ते अल्कोहोल तोडून बाहेर काढण्याचं काम करतं. मात्र यकृताची ही प्रक्रिया हळू असते. साधारणपणे एका तासात शरीर एकच स्टँडर्ड ड्रिंक पचवू शकतं. त्यापेक्षा जास्त मद्यपान केल्यास अल्कोहोल शरीरात साठत जातं.

दारू शरीरात किती वेळ राहते?
अल्कोहोल शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या काळासाठी राहतो. रक्तात दारूचे अंश साधारण 6 ते 12 तास राहू शकतात. हे प्रमाण व्यक्तीने किती प्यायलं आहे यावर अवलंबून असतं.

– श्वासातून अल्कोहोलचा वास किंवा अंश 12 ते 24 तासांपर्यंत आढळू शकतो. त्यामुळे रात्री प्यायलेली दारू सकाळीही ड्रायव्हिंगसाठी धोकादायक ठरू शकते.

– लघवीतून दारूचे अंश साधारण 12 ते 48 तास दिसून येतात. काही तपासण्यांमध्ये हे अंश 3 ते 4 दिवसांपर्यंतही आढळू शकतात.

– लाळेमध्ये अल्कोहोल 12 ते 48 तास टिकू शकतो.

– केसांमध्ये अल्कोहोलचे अंश सर्वात जास्त काळ टिकतात. केसांच्या मुळांमध्ये हे अंश तब्बल 90 दिवसांपर्यंत राहू शकतात. त्यामुळे जुने मद्यपानही तपासणीत समजू शकतं.

दारू जास्त वेळ शरीरात का टिकते?
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात दारू टिकण्याचा कालावधी वेगळा असतो. महिलांच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असल्याने त्यांच्यात अल्कोहोल जास्त काळ राहू शकतो. वय वाढल्यावर यकृताची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे दारू पचायला अधिक वेळ लागतो. उपाशी पोटी मद्यपान केल्यास अल्कोहोल लवकर रक्तात मिसळतं.काही औषधं घेत असतील तर यकृतावर ताण वाढतो आणि दारू बाहेर पडायला उशीर होतो.

एकंदरीत दारूचा परिणाम फक्त त्या रात्रीपुरता नसतो. पुढच्या दिवशीही शरीरावर त्याचे परिणाम असू शकतात. त्यामुळे मद्यपान करताना मर्यादा पाळणं आणि शरीराला पुरेसा वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे.

Comments are closed.