मराठी अभ्यास केंद्राचा मुंबई महापालिकेवर एल्गार, मराठीद्रोही भूमिका घेणाऱ्या BMC आयुक्तांनी राजीनामा द्यावा; आंदोलकांची मागणी

मुंबईत मराठी शाळांच्या संरक्षणासाठी आज मराठी अभ्यास केंद्राने मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढला. यावेळी मोर्चाला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तरी आंदोलकांच्या अहिंसक निर्धारामुळे मोर्चा यशस्वी झाला. हुतात्मा स्मारकापासून सुरू झालेल्या मोर्चात आंदोलकांनी हुतात्म्यांना अभिवादन केले आणि महाराष्ट्र गीत गायन केले. फलक हातात घेऊन शांततेत पालिका मुख्यालयाकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी ठिकठिकाणी अडवले, फलक हिसकावले आणि आझाद मैदानात रेटले. तेथे धुमश्चक्री उडाली. आयुक्तांची भेट मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन केल्याने डॉ. दीपक पवार, आनंद भंडारे, साधना गोरे, स्वप्नील थोरात, कॉ. प्रकाश रेड्डी, धनंजय शिंदे, गोवर्धन देशमुख, माजी राज्यसभा सदस्य भालचंद्र मुणगेकर आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले, नंतर सोडले.

अखेर आयुक्त भूषण गगराणी यांनी शिष्टमंडळाला भेट दिली. मात्र आचारसंहितेचे कारण सांगून निवेदन स्वीकारले तरी चर्चेला नकार दिला. सहा महिन्यांपासून पत्रव्यवहाराला उत्तर न देणे, बंद शाळांच्या प्रश्नावर बैठक न घेणे याबाबत शिष्टमंडळाने आक्षेप घेतला. आयुक्तांनी पूर्वनिर्णयांची अंमलबजावणी होईल, नवे निर्णय नाहीत, असे सांगितले.

या भेटीचा सर्व वृत्तांत शिष्टमंडळाने आंदोलकांना सांगितला तेव्हा उपस्थित सर्वांनी आयुक्त गगराणी यांचा तीव्र निषेध केला. आयुक्तांच्या मराठीद्रोही भूमिकेबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मराठी शाळा, मराठी भाषा हे मुद्दे सर्व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात येतील यासाठी सर्वांनाच कसून प्रयत्न करावे लागतील, असे डॉ. दीपक पवार यांनी आंदोलकांना सांगितले.

Comments are closed.