दिलीप वेंगसरकर फौंडेशन अंतिम फेरीत

प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फौंडेशनने गतविजेतेपदाच्या रुबाबात विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू पूनम राऊत, सलामीची सारा सामंत, मंजिरी गावडे आदींच्या दमदार खेळामुळे वेंगसरकर फौंडेशनने फोर्ट यंगस्टर्सचे उपांत्य फेरीतील आव्हान 7 विकेटने संपुष्टात आणले. हिमजा पाटील व झील डिमेलो यांनी फोर्ट यंगस्टर्सचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वा. एसपीजी खेळपट्टीवर माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय फोर्ट यंगस्टर्सला लाभदायक ठरला नाही. अष्टपैलू पूनम राऊतच्या (11 धावांत 4 बळी) अचूक ऑफ ब्रेक गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्ध्यांची तारांबळ उडाली. तिला मध्यमगती गोलंदाज अदिती सुर्वे व रेश्मा नायक, फिरकी गोलंदाज फातिमा जाफर व मुद्रा खेडेकर यांनी प्रत्येकी एक बळी घेत उत्तम साथ दिली. परिणामी हिमजा पाटील (38 चेंडूंत 33 धावा) व झील डिमेलो (19 चेंडूंत 23 धावा) यांनी छान फलंदाजी करूनही फोर्ट यंगस्टर्सला मर्यादित 20 षटकांत 8 बाद 111 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. सलामीची सारा सामंत (34 चेंडूंत 47 धावा) व मंजिरी गावडे (29 चेंडूत नाबाद 30 धावा) यांच्या दुसऱया विकेटसाठी 68 धावांच्या भागीदारीमुळे वेंगसरकर फौंडेशनने विजयी लक्ष्य 13.4 षटकात 3 बाद 114 धावा फटकावून सहज गाठले. मानसी पाटील (21 धावांत 2 बळी) व जान्हवी काटे (14 धावांत 1 बळी) यांनी छान फिरकी गोलंदाजी केली.

Comments are closed.