संजू धावा कर अन् धावा कर!
>> संजय कऱ्हाडे
संजू सॅमसनने धावा करणं आवश्यक आहेच, पण त्याआधी देवाचा धावा करणं अधिक आवश्यक होऊन बसलंय! कारण फक्त मैदानावर धावा करून त्याची कारकीर्द मार्गी लागताना दिसत नाहीये! संजूने त्याचं नाणं आधीच खणकवलेलं आहे, मात्र त्याची जागा गंपू गंभीरने हट्टाने दिली शुभमन गिलला. शुभमन टी-ट्वेंटीमध्ये सलामीला जाऊ शकतो की नाही हा विवादाचा विषय. टी-ट्वेंटी आणि शुभमन हे गणित जमतं की नाही हा आणखी एक वेगळा मुद्दा.
संजूचं काय करायचं. अधिक महत्त्वाचं, संजूने काय करायचं. शुभमनला दुखापत झाली. लखनौच्या सामन्यात संजूला संधी मिळाली. पण धुक्याने धोका दिला! आजचा सामनाही कदाचित शुभमन खेळणार नाही आणि संजूला संधी मिळेल.
आतापर्यंत या विषयावर एवढी चर्चा, वाद झाला. त्यामुळे संजू जर आजच्या सामन्यात खेळला तर त्याची मनःस्थिती कशी असेल! त्याने बिनधास्त फलंदाजी करावी की आपली विकेट सांभाळून! शुभमन दुखापतीमधून परतल्यावर पुन्हा संघात येणार की बिनधास्त धावा केल्यावर संजूचं स्थान सुरक्षित राहणार! तुम्हीच सांगा…
प्रश्न संजूला आयपीएलमध्ये कोणी किती कोटी रुपये दिले हा नाही. प्रश्न देशासाठी खेळण्याचा आहे. त्यातला अभिमान, सन्मान आणि समाधान याला तोड नाही. लहानपणी हातात बॅट घेणारा, देशासाठी खेळण्याचं स्वप्न बघणारा कोटीचं स्वप्न पाहत नसतो! त्याचं लक्ष्य पैशांपलीकडचं असतं! इतरांपेक्षा वेगळी प्रतिमा उमटवण्याचं असतं!
आज त्याच्या संघात असण्या-नसण्यावरून होणारा वाद संजूसाठी तिरस्करणीय असू शकतो! याचसाठी केला का अट्टहास, असा अनुत्तरीय सवाल असू शकतो!
नव्या पिढीसाठी असले प्रश्न नकारात्मक ठरू शकतात. का खेळायचं?, का स्वप्नं पाहायची?, का अट्टहास करायचा?, का जीव जळवायचा?, का आई-बापाच्या काळजाचे ठोके वाढवायचे इत्यादी. मुळात, घालमेल का वाढवायची…
मी असे मुद्दे मांडून काय साधतोय अशीही घालमेल उभी ठाकू शकेल. पण असे मुद्देच नवीन पिढीला मानसिकदृष्टय़ा तयार करू शकतील असं माझं मत आहे!
असो. आज शेवटच्या सामन्यात संजू खेळेल, छान धावा करेल, त्याचं स्वप्न जिवंत ठेवेल अशी माझी इच्छा, अपेक्षा आहे.
गंपू गंभीर चांगला फलंदाज होता यात वाद नाही. 2007 च्या टी–ट्वेंटी आणि 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने अनुक्रमे 75 आणि 97 धावा केल्या होत्या हे माझ्या ठावकी आहे. म्हणूनच त्याने काही हट्ट सोडून द्यावेत असा माझा आग्रह आहे!
विश्वचषक आता नजरेच्या पट्टय़ात आलाय, खेळाडूंना स्थिरता अन् आत्मविश्वासाची आवश्यकता आहे आणि तीच यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे याचं गंपू गंभीरने भान ठेवावं इतकीच इच्छा आहे!
गंपू, एवढं कर!
Comments are closed.