‘तेजयश’ रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांच्या भावाचेच; बुकिंग लिंकवर प्रकाश शिंदे यांचे नाव! सुषमा अंधारे यांनी पुरावे दाखवले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱयातील दरे गावाजवळच्या सावरीतील तेजयश रिसॉर्टजवळ मुंबईच्या पोलीस पथकाने छापा टाकत 145 कोटी रुपये किमतीचे 45 किलो ड्रग्ज जप्त केले होते. आज शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांचेच असून तेच चालवत असल्याचे पुरावे पत्रकार परिषदेत झळकावले आणि ‘तो मी नव्हेच’ म्हणणाऱया प्रकाश शिंदे यांना उघडे पाडले.
वाल्मीक कराडप्रकरणी मुंडे यांचा राजीनामा घेतला, तर मग इथे प्रकाश शिंदे तर एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत. मग उपमुख्यमंत्री असल्यामुळे तपासाला आपले पद प्रभावित करू शकते असे वाटत असेल तर राजीनामा द्या, अशी मागणी अंधारेंनी केली आहे. याप्रकरणी आपण राज्यपालांची भेट घेणार आहोत तसेच मुख्यमंत्र्यांकडेही भेटीसाठी वेळ मागणार असून हे ड्रग्ज प्रकरण त्यांना अवगत करणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
गुगलमध्ये जाऊन तुम्ही तेजयश त्या हॉटेलचे नाव टाकले तर ते येते, हे त्यांनी मोबाईलवर दाखवले. त्या म्हणाल्या, प्रकाश शिंदे खोटे का बोलले, ते म्हणाले हे माझे हॉटेल नाही. जर ही जागा कमर्शियल नसेल तर त्याला रेटिंग कशी काय येईल. याला 4.8 चे रेटिंग आहे. गुगलवर डायरेक्शन आहे आणि व्हॉट्सऍप नंबरदेखील दिलेला आहे. इथे ऑनलाइन बुकिंगही करता येते. तिथे दिलेल्या नंबरवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सऍपमध्ये प्रकाश शिंदे असे नाव आले. हे हॉटेल अजूनही प्रकाश शिंदे चालवतात. कारण इथे त्यांचा नंबर दिलेला आहे, असे म्हणत त्यांनी पुरावा दाखवला.
ड्रग्जचा पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो का?
ड्रग्जमधून मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो का, असा सवाल करत त्यांनी 22-25 हजार रुपयांत मत विकत घेतले जाऊ शकते, असा गंभीर आरोप केला.
एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा
सुषमा अंधारे म्हणाल्या, याप्रकरणी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा मागत आहे. वाल्मीक कराडप्रकरणी मुंडे यांचा राजीनामा घेतला, तर मग इथे प्रकाश शिंदे तर एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत. मग उपमुख्यमंत्री असल्यामुळे तपासाला आपले पद प्रभावित करू शकते असे वाटत असेल तर राजीनामा द्या.
पालकमंत्री नेमके काय करत आहेत?
तुषार दोशी आणि पालकमंत्री शंभुराज देसाई या दोघांनाही प्रश्न आहे, तुम्ही नेमके काय करत होतात? तिथल्या पालकमंत्र्यांना कळले पाहिजे की, राज्यातील सर्वात महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र माझ्या जिह्यामध्ये आणि मी या पर्यटनस्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे. ज्याअर्थी तिथे इतके सगळे होत आहे, तिथे कोणी बॉम्ब ब्लास्ट करून गेले तरी त्यांना कळणार नाही. पालकमंत्री नेमकं काय करत आहे, असा सवाल अंधारे यांनी केला.
जमीन विकल्याचा शिंदेंच्या भावाच्या दाव्याची पोलखोल
जागा आपण विकली असे एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांचा दावा असला तरी त्यांनी विकत घेतलेल्या त्या जागेचा व्यवहार झाला असल्याचे कुठेही दिसत नाही. त्यामुळे त्यांचा दावा फोल ठरला आहे. या जागेची मालकी आजही प्रकाश शिंदे यांचीच असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटले आहे. प्रकाश शिंदे यांनी 2020 मध्ये सुमारे साडेतीन एकर जागा बारा लाखांना खरेदी केली आणि त्यानंतर अजून तरी तिचं हस्तांतरण झाल्याची कुठलीही माहिती पुढे येत नाही, असे नमूद करत त्यांनी खरेदी खतच पोस्ट केले.
Comments are closed.