जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले.
वयाच्या शंभरीनंतर दिल्लीमध्ये अखेरचा श्वास : नोएडामध्ये अंत्यसंस्कार, राष्ट्रपती-पंतप्रधानांकडून शोकभावना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ बनवणारे तसेच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे बुधवारी रात्री उशिरा दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने नोएडा येथे पूर्ण शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेते आणि दिग्गजांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी शिल्पकलेच्या प्रांतातील चालता बोलता इतिहास अशी जगभरात ओळख निर्माण केली होती. त्यांनी केवळ महाराष्ट्र-गोवा किंवा भारतातच नाही, तर जगभरात 200 हून अधिक शिल्पे बनवली आहेत. त्यांना पद्मश्री, महाराष्ट्र भूषणसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. राम सुतार वृद्धापकाळातही राष्ट्रीय सेवेत सक्रिय राहिले. वयाच्या 100 व्या वर्षीही ते इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात सहभागी होते. त्यांनी साकारलेल्या अनेक पुतळ्यांद्वारे त्यांची कला शतकानुशतके देशवासियांच्या आठवणीत राहील.
राम सुतार मूळचे महाराष्ट्रातील धुळे जिह्यातील गोंदूर या गावचे होते. त्यांचा जन्म इथेच 1925 मध्ये झाला होता. अतिशय गरीब कुटुंबात त्यांचे बालपण गेले. पुढे त्यांच्या गुरुजींनी श्रीराम जोशी यांनी राम सुतार यांना मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यास सांगितल्यानंतर त्याठिकाणीच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आपल्या कारकिर्दीत अतिशय भव्य शिल्प उभारत त्यांनी जगभरात वेगळी ओळख निर्माण केली होती. दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांची शिल्पे आहेत. शिवाय स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे, परदेशात महात्मा गांधींचे अनेक पुतळे त्यांनी उभारले आहेत. तसेच अंदमानमधील वीर सावरकरांच्या पुतळ्याच्या उभारणीची जबाबदारीही त्यांच्यावरच टाकण्यात आली होती.
राम सुतार यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरातत्व विभागाकडून 1950 मध्ये अजिंठा लेण्यांचे पुनर्जतन करण्याचे काम मिळाले होते. शिल्पकलेची आवड असल्याने त्यांनी नोकरी सोडत शिल्पकलेचे आपले स्वत:चे काम सुरू केले होते. त्यांनी उभारलेल्या पुतळ्यांचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही कौतुक केले होते. त्यांनी महात्मा गांधी यांचे अनेक पुतळे परदेशात तयार करुन दिले होते. इंग्लंड, इटली, फ्रान्स, रशिया यासारख्या अनेक देशात त्यांनी तयार केलेले पुतळे उभे आहेत. त्यांच्या या अतुलनीय कामासाठी त्यांना भारत सरकारकडूनही पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
निधनाचे वृत्त समजताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद साधत ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री फडणवीस यांची विनंती तातडीने मान्य करत त्यांच्या पार्थिवावर नोएडा येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.
त्यांच्या कलेने देशाला नवीन ओळख दिली : पंतप्रधान
भारत आणि जागतिक कला जगताने एक महान शिल्पकार गमावला आहे, अशी शोकभावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. त्यांच्या कलात्मक प्रतिभेने आणि अद्वितीय कारागिरीने भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिलीच, शिवाय देशाच्या गौरवशाली संस्कृती आणि इतिहासाला कायमचे अमर केले. सुतार यांचे सर्वात प्रसिद्ध काम म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आहे. ही प्रतिमा अजूनही जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये गणली जात असून ते भारतीय अभिमानाचे प्रतीक आहे. राम सुतार हे एक असाधारण कलाकार होते, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
Comments are closed.