बांगलादेशात पुन्हा आंदोलन पेटले! विद्यार्थी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांना आग

बांगलादेशातील विद्यार्थी नेते शरीफ ओसमान हादी यांच्या निधनानंतर बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये रात्रभर हिंसक निदर्शने झाली. ३२ वर्षीय हादी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते आणि त्यांच्या हिंदुस्थानविरोधी भूमिकेमुळे ते चर्चेत होते. २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या सत्तेला सुरुंग लावणाऱ्या विद्यार्थी आंदोलनातून ते प्रकाशझोतात आले होते. ‘इन्कलाब मंच’ या व्यासपीठाचे प्रवक्ते आणि आगामी सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवार असलेल्या हादी यांच्यावर गेल्या शुक्रवारी ढाका येथे प्रचार करताना हल्ला झाला होता. मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. त्यांच्यावर सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

प्रसारमाध्यमांवर हल्ला आणि तणाव हादी यांच्या मृत्यूची बातमी समजताच हजारो आंदोलक ढाका आणि इतर शहरांच्या रस्त्यावर उतरले. ढाका येथील ‘द डेली स्टार’ आणि ‘प्रथम आलो’ या दोन अग्रगण्य माध्यम समूहांच्या इमारतींना आंदोलकांनी आग लावली. यावेळी कर्मचारी इमारतीत अडकल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलकांनी हादी यांच्या समर्थनार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

हिंदुस्थानविरोधी भावनांना उधाण या हिंसेचे पडसाद चितगावमध्येही उमटले, जिथे आंदोलकांनी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करत हिंदुस्थानविरोधी घोषणा दिल्या. राजशाही येथे आंदोलकांनी शेख मुजिबूर रहमान यांचे निवासस्थान आणि अवामी लीगच्या कार्यालयाची तोडफोड करून आग लावली. नॅशनल सिटीझन पार्टीच्या (NCP) काही नेत्यांनी हिंदुस्थानच्या ईशान्येकडील ‘सेव्हन सिस्टर्स’ राज्यांबाबत प्रक्षोभक विधाने केल्याने दोन्ही देशांतील राजनैतिक तणाव वाढला आहे. भारताने या प्रक्षोभक विधानांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

मोहम्मद युनूस यांचे शांततेचे आवाहन देशातील वाढता तणाव पाहता अंतरीम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी देशाला संबोधित केले. “हादी यांचे निधन ही लोकशाहीची मोठी हानी आहे,” असे सांगत त्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शनिवारी बांगलादेशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

बांगलादेशात १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार असून, त्याआधी सुरू असलेल्या या हिंसाचारामुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Comments are closed.