Winter Mental Health: थंडीत फॉलो करा ‘या’ सवयी; निरोगी शरीरासह मूडही राहील फ्रेश
हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते. परिणामी नैसर्गिक सूर्यप्रकाशाच्या संपर्कात व्यक्ती कमी येतात. यामुळं शरीराचे नैसर्गिक घड्याळ बिघडतं आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तज्ञांच्या मते, सूर्यप्रकाशाचा अभाव शरीराच्या सर्काडियन लयवर परिणाम करतो आणि सेरोटोनिन आणि मेलाटोनिन सारख्या न्यूरोट्रांसमीटरमध्ये असंतुलन निर्माण होतं. त्यामुळं या ऋतूत काही आरोग्यदायी सवयी पाळल्या तर त्याचा फायदा आरोग्याला तर होतोच शिवाय मानसिक आरोग्य सुधारतं. मूड फ्रेश राहण्यास मदत होते. ( Winter Mental Health Tips )
झोप
हिवाळ्यात थंडीमुळं जास्त झोप घेण्याची सवय अनेकांना असते. किंवा व्यस्त जीवनशैलीमुळं झोपेची वेळ अनियमित असते. यामुळे मूड खराब होऊ शकतो. अशावेळी दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ एकच ठेवा. तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी ७-८ तासांची चांगली झोप घेणं आवश्यक आहे.
सूर्यप्रकाश
हिवाळ्यात दिवस लहान असतो आणि कमी सूर्यप्रकाश असतो. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळं शरीरात सेरोटोनिनची पातळी कमी होते, त्याचा मूडवर परिणाम होतो. म्हणून सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवल्याने मूड सुधारतो आणि व्हिटॅमिन डी देखील मिळते. दररोज किमान १५-२० मिनिटे सकाळच्या उन्हात चालण्याचा प्रयत्न करा.
व्यायाम
हिवाळ्यात थंडीमुळं बाहेर जाणं कमी होतं आणि शारीरिक हालचाल होत नाही. यामुळे आळस आणि ताण वाढू शकतो. व्यायाम केल्याने तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता आणि एंडोर्फिन नावाचं हॅपी हॉर्मोन वाढवण्यास मदत होते. तुम्ही घरी योगा, जॉगिंग किंवा हलका व्यायाम करू शकता.
संतुलित आहार
हिवाळ्यात लोक अनेकदा तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खातात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी, तुमच्या आहारात हंगामी फळे, भाज्या, सुकामेवा आणि संपूर्ण धान्ये समाविष्ट करा. यामुळे ऊर्जा मिळेल आणि तुमचा मूड स्थिर होईल. तसेच ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेले पदार्थ, जसे की मासे, अक्रोड आणि बियाणे मूडसाठी फायदेशीर ठरतात.
हायड्रेशन
थंडीत अनेकांना कमी पाणी पिण्याची सवय असते, पण शरीर हायड्रेट ठेवणे महत्त्वाचं आहे. पुरेसे पाणी पिल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास आणि निरोगी त्वचा राखण्यास मदत होते. तुम्ही हर्बल टी, कोमट पाणी आणि सूप देखील घेऊ शकता.
छंद जोपासा
हिवाळ्यात तुमचा मूड चांगला ठेवण्यासाठी वाचन, संगीत किंवा चित्रकलायासारखा तुमच्या छंद जोपासा. यामुळं तुमच्या मनात जास्त नकारात्मक विचार येणार नाहीत.
मनःशांती
हिवाळ्यात मूड स्विंग्स होणं सामान्य आहे, परंतु सकारात्मक दृष्टिकोन राखणं महत्वाचं आहे. त्यासाठी दररोज ध्यान करण्यासाठी थोडा वेळ काढा. यामुळे तुमचं मन शांत होईल आणि मूड स्थिर राहील. तसेच दिवसांत त्वचा आणि केसांच्या समस्या वाढतात त्यामुळं नियमितपणे स्किनकेअर आणि हेअरकेअर करा. यामुळं तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुमचा मूड सुधारेल.
Comments are closed.