2026 टी-20 वर्ल्ड कपसाठी वरुण चक्रवर्तीचा मास्टर प्लॅन! प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांसाठी ठरणार अडचण

आयसीसीचा (ICC) नंबर-1 टी-20 गोलंदाज वरुण चक्रवर्तीने (Varun chakrawarthy) 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी आपली तयारी कशी सुरू आहे, याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. वरुणच्या मते, वर्ल्ड कपसाठी तयार होताना स्वतःवर दबाव राखणे आवश्यक आहे. तो म्हणतो, जेव्हा समोर कोणतेही मोठे आव्हान नसेल, तेव्हाही तुम्हाला स्वतःला चॅलेंज द्यावे लागेल. एखादा सामना सोपा वाटत असला, तरी मानसिकरित्या स्वतःवर दबाव निर्माण करून खेळणे महत्त्वाचे आहे.

वरुणने सांगितले की, त्याचा मुख्य प्लॅन प्रतिस्पर्धी संघाला नीट समजून घेण्याचा आहे. योग्य लेन्थवर बॉलिंग करणे आणि प्रतिस्पर्ध्याची रणनीती ओळखणे हा यशाचा मोठा भाग आहे. मी फक्त मूलभूत गोष्टींवर (Basics) लक्ष देतो. गेल्या तीन सामन्यांत हे तंत्र यशस्वी ठरले आहे आणि पुढेही मी हेच सुरू ठेवीन.

वरुणच्या मते, कामगिरीमध्ये मानसिकतेचा मोठा वाटा असतो. जर तुमचा आत्मविश्वास कमी असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या कौशल्यावर (Skills) होतो. सातत्यपूर्ण कामगिरीचे रहस्य म्हणजे स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवणे आणि जास्त बदल न करता आपला नैसर्गिक खेळ खेळणे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करताना वरुणला सुरुवातीला अडचणी आल्या होत्या. मात्र, त्याने सराव करून आपल्या चुका सुधारल्या. वरुणने आतापर्यंत 32 टी-20 सामन्यांत 51 विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्या तीन सामन्यांत त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत.

Comments are closed.