Parenting Mistake : पॉकेट मनी मुलांना बिघडवतो, मानसोपचार तज्ज्ञांचा इशारा

आजच्या बदलत्या जीवनशैलीत मुलांना लहानपणापासूनच पैसे हाताळायला देणं सामान्य झालं आहे. पॉकेट मनी म्हणजे स्वातंत्र्य, जबाबदारी आणि आत्मनिर्भरतेची पहिली पायरी असं अनेक पालकांना वाटतं. मात्र हाच पॉकेट मनी जर मर्यादेबाहेर गेला, तर तो मुलांच्या वागण्यात, विचारसरणीत आणि नात्यांमध्ये मोठा बदल घडवू शकतो. (does pocket money spoil children parenting psychology)

‘ओन्ली मानिनी’ला दिलेल्या मुलाखतीत मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक डॉक्टर आदिती आचार्य यांनी याबाबत स्पष्ट मत मांडलं. त्या म्हणाल्या की अनेक शिक्षक आणि पालकांची एकच तक्रार असते की आजची मुलं त्यांना गंभीरपणे घेत नाहीत. शिक्षक सांगतात की मुलं शाळेत ऐकत नाहीत, तर पालक म्हणतात की घरातही तेच चित्र आहे. हे अचानक घडत नाही, तर त्याची सुरुवात खूप लहान वयातच होते.

डॉक्टर आदिती आचार्य यांच्या मते, एखाद्या मुलाला लहानपणापासून सतत “तू खास आहेस”, “तुला सगळं लगेच मिळायला हवं” असं सांगितलं गेलं, तर त्याच्या मनात एक वेगळीच भावना तयार होते. हीच मुलं शाळेत गेल्यावर शिक्षकांनाही तितक्याच हलक्याने घेतात. “आम्ही एवढी फी भरतो”, “माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे”, “माझं आयुष्य सेट आहे” असा विचार त्यांच्या मनात नकळत रुजतो. त्यामुळे शिक्षक काय सांगतात, शिस्त का पाळायची, याचं महत्त्व त्यांना उरत नाही.

या सगळ्यात पॉकेट मनीचा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. पालकांची आर्थिक क्षमता वेगवेगळी असते, पण केवळ परवडतं म्हणून लहान वयात मोठी रक्कम हातात देणं धोकादायक ठरू शकतं. जर एखाद्या 20 ते 25 वर्षांच्या मुलाला महिन्याला मोठ्या प्रमाणात पैसे सहज मिळत असतील, तर त्याला मेहनत करण्याची गरजच वाटेनाशी होते. सगळं बसल्या बसल्या मिळत असेल, तर करिअर घडवण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा कमी होऊ शकते.

मुलांना हे समजावणं फार गरजेचं आहे की घरातला पैसा हा त्यांचा स्वतःचा कमावलेला नसतो. तो आई-वडिलांच्या मेहनतीचा परिणाम असतो. “आई-वडिलांकडे पैसे आहेत म्हणून मी मोठा आहे” ही भावना मुलांच्या मनात रुजली, तर त्यातूनच समस्या सुरू होतात. पैसे देतानाही त्यामागचं भान आणि मूल्य शिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे.

आजकाल आणखी एक मोठी अडचण म्हणजे ‘इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन’. मुलांनी काही मागितलं की ते लगेच मिळायलाच हवं, असा पॅटर्न अनेक घरांमध्ये दिसतो. शाळेसाठी दोन वस्तू लागतात, पण सुरक्षिततेच्या नावाखाली दहा दिल्या जातात. त्यामुळे मुलांना थांबण्याची सवयच लागत नाही. एखादी गोष्ट मिळाली नाही, तर त्याची कमतरता काय असते, हेच त्यांना कधी कळत नाही.

अशा अतिशय संरक्षित वातावरणात वाढलेली मुलं जेव्हा मोठी होऊन समाजात वावरायला लागतात, तेव्हा वास्तवाशी सामना करावा लागतो. समाजात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, प्रत्येक माणूस आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही. अशावेळी अशा मुलांना पटकन राग येतो, चिडचिड होते आणि निराशा वाढते. कारण लहानपणापासून “नाही” ऐकायची सवयच त्यांना लागलेली नसते.

डॉक्टर आदिती आचार्य सांगतात की शाळेत मुलांचं वागणं हे थेट घरातून घडत असतं. आई-वडील जसं वागतात, जसं मुलांशी संवाद साधतात, तसंच वर्तन मुलं शिक्षकांशी, मित्रांशी आणि पुढे आयुष्यात इतर नात्यांमध्येही दाखवतात. आई-वडिलांशी असलेलं नातं हे सगळ्यात मूलभूत आणि घडवणारं नातं असतं. तेच पॅटर्न पुढे सगळीकडे दिसून येतात.

म्हणूनच पॉकेट मनी देणं चुकीचं नाही, पण त्याला मर्यादा, शिस्त आणि मूल्यांची जोड असणं गरजेचं आहे. पैसा देताना जबाबदारी, थांबण्याची सवय आणि मेहनतीचं महत्त्व शिकवलं, तरच मुलं खऱ्या अर्थाने सक्षम आणि समजूतदार बनू शकतात.

Comments are closed.