घरगुती क्रिकेटमध्ये रोहित शर्मा करणार पुनरागमन? संघ निवडीबाबत सस्पेन्स कायम!
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 च्या हंगामासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) आपल्या सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश दिले आहेत. याच कारणामुळे रोहितने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले होते की तो विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे. मात्र, विजय हजारे ट्रॉफीसाठी रोहित शर्मासह मुंबईचे काही मोठे खेळाडू स्क्वॉडचा भाग नाहीत, जी एक थक्क करणारी बाब आहे. याच गोष्टीमुळे आता रोहितच्या विजय हजारे ट्रॉफी खेळण्यावर सस्पेन्स निर्माण झाला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांसारख्या दिग्गज खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, याचा अर्थ असा मुळीच नाही की हे सर्व खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळणार नाहीत. मुंबई वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला (TOI) माहिती देताना सांगितले की, “हे सर्व खेळाडू उपलब्ध झाल्यावर संघात सामील होतील. जर ते सध्या उपलब्ध नसतील, तर केवळ नावासाठी त्यांना संघात स्थान देऊन एखाद्या युवा खेळाडूला बाहेर ठेवणे योग्य ठरणार नाही.”
सैयद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान यशस्वी जयस्वालला पोटाच्या त्रासामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याच्या पुनरागमनाबाबत संजय पाटील यांनी मोठे अपडेट दिले आहे. त्यांनी सांगितले की, “जेव्हा मेडिकल टीमकडून यशस्वीला ‘क्लिअरन्स’ (परवानगी) मिळेल, तेव्हाच त्याचा मुंबईच्या संघात समावेश केला जाईल.” जयस्वाल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यासाठी विजय हजारे ट्रॉफी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून भारतीय एकदिवसीय (ODI) संघातील आपले स्थान कायम टिकवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने देखील विजय हजारे ट्रॉफीचे सुरुवातीचे सामने खेळलेले नाहीत. मुंबईचे वरिष्ठ निवडकर्ते संजय पाटील यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, “अजिंक्य रहाणेला ‘हॅमस्ट्रिंग’चा त्रास होत आहे आणि याच कारणामुळे तो विश्रांती घेईल. काही सामन्यांनंतर तो पुन्हा मुंबईच्या संघात सामील होईल.”
Comments are closed.