तैवान हादरलं! मेट्रो स्थानकावर माथेफिरुचा चाकू आणि स्मोक ग्रेनेडने हल्ला; तिघांचा मृत्यू, 5 जखमी

तैवानची राजधानी तैपेईमध्ये शुक्रवारी सायंकाळी एका माथेफिरून मेट्रो स्थानकावरील प्रवाशांवर स्मोक ग्रेनेड आणि चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून पाच प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस हल्लेखोराचा पाठलाग करत असताना तो इमारतीवरून खाली पडला आणि त्याचा जागीच मृ्त्यू झाला. या हल्ल्याचा एक भयंकर व्हिडीओही समोर आला आहे. यात हल्लेखोर बॅगेतून एक-एक स्मोक ग्रेनेड काढून हल्ला करताना दिसत आहे.
तैवानमध्ये एका व्यक्तीने मेट्रो स्थानकात स्मोक बॉम्ब सोडल्यानंतर, जवळच्या लोकांवर चाकूने हल्ला करण्यापूर्वी 3 ठार आणि अनेक जखमी.
pic.twitter.com/361X81Gbsr— टॉमी रॉबिन्सन 🇬🇧 (@TRobinsonNewEra) १९ डिसेंबर २०२५
तैपेई रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. हा हल्ला झाला तेव्हा मेट्रो स्थानकाजवळ प्रचंड गर्दी होती. याचाच फायदा घेत आधी हल्लेखोराने एक-एक स्मोक ग्रेनेड बॅगेतून बाहेर काढत फेकले आणि त्यानंतर दिसेल त्याच्यावर चाकूने वार केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले.
हल्लेखोराच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळताच तैपेई पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्लेखोराचा पाठलाग केल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि तो इमारतीवरून खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार होता.

Comments are closed.