हार्दिक–तिलकचं वादळ, वरुणचा कहर; नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा फडशा पाड

भारताने दक्षिण आफ्रिकेचा 5वा T20 सामना केला: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा व निर्णायक टी-20 सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला होता. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावून तब्बल 232 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना वरुण चक्रवर्तीच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेने सपशेल शरणागती पत्करली. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी-20 मालिका 3-1 ने आपल्या नावावर केली. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या तोंडावर मिळालेला हा मालिका विजय भारतीय संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे.

अभिषेक – संजूची झंझावाती सुरुवात, पण सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी

भारताकडून डावाची सुरुवात करणाऱ्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी आक्रमक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी रचली. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 34 धावा करताना 6 चौकार आणि 1 षटकार लगावला, मात्र त्यानंतर तो बाद झाला. यानंतर संजू सॅमसनने चमकदार खेळी करत 22 चेंडूत 37 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ 5 धावांवर तंबूत परतला.

हार्दिक – तिलकची वादळी खेळी

यानंतर मैदानावर उतरलेल्या तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर अक्षरशः हल्ला चढवला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 44 चेंडूत 105 धावांची तुफानी भागीदारी केली आणि अर्धशतक झळकावले. हार्दिक पांड्याने 25 चेंडूत 63 धावा करताना 5 चौकार आणि 5 षटकार लगावले. तर तिलक वर्माने 42 चेंडूत 73 धावांची जबरदस्त खेळी साकारली, ज्यात 10 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. तो अखेरच्या षटकात रनआउट झाला. शिवम दुबे 10 धावांवर नाबाद राहिला. ज्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 विकेट्स गमावून 232 धावांचा डोंगर उभा केला. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन वॉश याने 2 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकचे अर्धशतक

भारताने दिलेल्या 232 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला क्विंटन डी कॉकने आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र त्यांचा सलामीवीर साथीदार रिझा हेंड्रिक्स अपेक्षेप्रमाणे खेळ करू शकला नाही. तो 12 चेंडूंमध्ये 13 धावा करून बाद झाला. यानंतर डी कॉकने जबाबदारी घेत 35 चेंडूंमध्ये 66 धावांची शानदार खेळी साकारली, पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला आणि बाद झाला. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविसने 17 चेंडूंमध्ये 31 धावा करत काहीसा प्रतिकार केला, मात्र तोही पॅव्हेलियनमध्ये परतला.

दक्षिण आफ्रिकेची ढासळलेली फलंदाजी

यानंतर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. कर्णधार एडन मार्करम अवघ्या 6 धावा करून माघारी गेला, तर डोनोव्हन फरेराला खातेही उघडता आले नाही. जॉर्ज लिंडेने 8 चेंडूंमध्ये 16 धावा केल्या, मात्र तोही बाद झाला. अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर 14 चेंडूंमध्ये 18 धावा करून तंबूत परतला. मार्को यान्सनने 5 चेंडूंमध्ये 14 धावांची झटपट खेळी केली, पण त्यालाही आपली विकेट गमवावी लागली. या अपयशी फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत आठ गडी बाद 201 धावाच करू शकला आणि सामना गमावला.

हे ही वाचा –

Mumbai Squad Vijay Hazare Trophy : मुंबई संघात अचानक मोठा ट्विस्ट; रोहित शर्माची झाली निवड, पण बाकीचे स्टार खेळाडू गायब, पाहा संपूर्ण Squad

आणखी वाचा

Comments are closed.