Year Ender: 2025 वर्ष मराठी माणसांसाठी ठरलं लकी, देशातले सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्रात
Year Ender 2025: कोणत्याही देशाची प्रगती ही केवळ अर्थव्यवस्थेवर नव्हे तर देशातील व्यक्तींनी कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा आणि साहित्यात केलेल्या अतुलनीय कामगिरीवरही अवलंबून असते. २०२५ हे वर्ष भारतासाठी अशाच प्रतिभावंतांच्या गौरवाचे वर्ष ठरलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्र सरकारने विविध क्षेत्रांत विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना देशाच्या सर्वोच्च नागरी आणि श्रेणीबद्ध पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. २०२५ हे वर्ष महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरलं आहे. २०२५ मध्ये भारताच्या विविध सर्वोच्च नागरी आणि क्षेत्राभिमुख पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तींनी सर्वाधिक आणि महत्त्वाचे सन्मान मिळवून राज्याची मान उंचावली आहे. चला तर मग सरत्या वर्षानिमित्त २०२५ मधील भारतातील प्रमुख नागरी, चित्रपट, क्रीडा आणि साहित्य पुरस्कारांचा आढावा घेऊया… ( Major Awards in India 2025 )
नागरी पुरस्कार: पद्म पुरस्कार २०२५
भारतातील नागरी सन्मानांमध्ये पद्म पुरस्कारांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. २०२५ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात समाजाच्या तळागाळातील अनेक व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
पद्मविभूषण
देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण यावर्षी ७ मान्यवरांना देण्यात आला. त्यात बिहारच्या सुप्रसिद्ध लोकगायिका श्रीमती शारदा सिन्हा यांना मरणोत्तर, प्रख्यात व्हायोलिन वादक श्री लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर, व्यापार आणि उद्योगसाठी श्री ओसामु सुझुकी, मल्याळम साहित्यकार श्री एम. टी. वासुदेवन नायर, कलेसाठी श्रीमती कुमुदिनी लाखिया, औषधशास्त्र वक्षेत्रातून डॉ. दुर्वुर नागेश्वर रेड्डी यांना सन्मानित करण्यात आलं.
पद्मभूषण
सार्वजनिक क्षेत्रातील कामगिरीसाठी यंदा १९ मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांचा समावेश आहे.
पद्मश्री
कला, शिक्षण आणि समाजसेवा यांसारख्या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी ११३ जणांना पद्मश्री देण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली, डॉ. विलास डांगरे, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीसाठी चैत्राम पवार आणि इतर व्यक्तींना गौरवण्यात आलं आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५
क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा १७ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती भवनात गौरव करण्यात आला. यंदा नेमबाजी खेळाडू मनू भाकर, बुद्धिबळ खेळाडू डी. गुकेश, हॉकी खेळाडू हरमनप्रीत सिंग,(पॅरा ॲथलेटिक्स खेळाडू प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर अर्जुन पुरस्कार नेमबाजीसाठी स्वप्नील कुसाले, क्रिकेटसाठी आर. अश्विन आणि ॲथलेटिक्ससाठी ज्योती याराजी यांना देण्यात आला. तर जलतरणात भारताचे पहिले पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत राजाराम पेटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शूटिंग खेळाडू दीपाली देशपांडे हिला द्रोणाचार्य पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२५
भारतीय चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा हा सर्वात मानाचा मानला जातो. २०२५ मध्ये ७१ व्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं. दक्षिण भारतीय सुपरस्टार मोहनलाल यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट: ‘१२ फेल’, सर्वोत्कृष्ट अभिनेता: ‘जवान’ चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ‘१२ फेल’साठी विक्रांत मेस्सी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटासाठी राणी मुखर्जीला गौरवण्यात आलं. यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘श्यामची आई’, सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार ‘नाळ २’ चित्रपटासाठी भार्गव जगताप, श्रीनिवास पोकळे आणि त्रिशा ठोसर यांना देण्यात आला.
साहित्य अकादमी पुरस्कार
२०२५ मध्ये विविध भारतीय भाषांमधील लेखकांना गौरविण्यात आले. बाल साहित्यासाठी नितीन कुशालप्पा (इंग्रजी) आणि विनय कुमार ब्रह्मा (बोडो) यांना सन्मानित करण्यात आले. तर २०२५ चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देऊन गौरवण्यात आलं. राजस्थानच्या मनिका विश्वकर्मा हिने मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ हा किताब पटकावला.
Comments are closed.