भाईंदरच्या पारिजात इमारतीत बिबट्या घुसला; सात जणांवर हल्ला, आठ तासांच्या थरार नाट्यानंतर जेरबंद

वेळ सकाळी सात-साडेसातची… भाईंदर पूर्वेतील गजबजलेल्या वस्तीत असलेल्या पारिजात इमारतीत अनपेक्षितपणे बिबट्याची डरकाळी कानावर पडली आणि सर्वांचीच पाचावर धारण बसली. इमारतीच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचे समजताच अनेकांनी दरवाजे, खिडक्या लावून स्वतःला काsंडून घेतले. तरीही या बिबट्याने इमारत व परिसरातील सात जणांवर हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. डरकाळी, धावाधाव आणि घाबरलेल्या नागरिकांच्या किंकाळ्यांमुळे आज दिवसभर अवघे भाईंदर हादरून गेले होते.
भाईंदरच्या बीपी रोडवरील स्वामीनारायण मंदिराचा परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. सकाळी 7.30च्या सुमारास पारिजात इमारतीच्या बी विंगमधील फ्लॅट क्रमांक 101मध्ये बिबट्या घुसला आणि एकाच कुटुंबातील अंजली टाक (23), खुशी टाक (19), भारती टाक (55) या तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने अंजलीच्या चेहऱयावर पंजा मारल्याने ती रक्तबंबाळ झाली, तर अन्य दोघांच्याही हाता-पायाचे लचके तोडले. याच परिसरातील प्रकाश यादव (50), श्याम सहानी (19), दिपू भौमिक (52), छगनलाल बागरेचा (48) यांनाही गंभीर जखमी केले आहे. सर्वांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले
बिबट्याला जेरबंद केल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास वन विभागाच्या पिंजऱयामध्ये त्याला सलाईन लावण्यात आले. सध्या त्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांच्या रुग्णालयात करण्यात आली आहे. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे उपवनसंरक्षक सचिन रेपाल यांनी सांगितले.
नागरी वस्तीमध्ये संरक्षक भिंत बांधा
नागरी वस्तीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बिबट्या शिरत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. संरक्षित जंगल व कांदळवन यांना संरक्षण देण्यासाठी भिंत बांधावी व त्या भागात झालेले अतिक्रमण जमीनदोस्त करावे, अशी मागणी भाईंदरवासीयांनी केली आहे. या भागातील डोंगर पह्डण्यात येत असून कांदळवनही तोडले आहे. नैसर्गिक तलाव बुजवून त्या जागेवर आरएमसी प्लॅण्ट टाकले जात आहेत. हे प्रकार त्वरित थांबवा अशी आग्रहाची मागणी विविध स्वयंसेवी संघटनांनी केली आहे.

Comments are closed.