IND vs SA T20: सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर? ‘या’ खेळाडूंनी गाजवली मालिका
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका संपली असून टीम इंडियाने 3-1 असा दमदार विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत सामना जिंकला. संपूर्ण मालिकेत तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
2025 मध्ये झालेल्या या टी-20 मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान तिलक वर्माला मिळाला. त्याने चार सामन्यांत एकूण 187 धावा केल्या असून त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. पाचव्या टी-20 मध्ये तिलकने 42 चेंडूत 73 धावा करताना 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याने भारताच्या विजयात निर्णायक योगदान दिले. याशिवाय दुसऱ्या टी-20 मध्ये त्याने 34 चेंडूत 62 धावा ठोकल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉक सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने चार सामन्यांत 156 धावा केल्या, ज्यात 90 धावांची सर्वोच्च खेळी होती. दुसऱ्या टी-20 मध्ये त्याच्या शानदार खेळीमुळे आफ्रिकेने 51 धावांनी विजय मिळवला होता आणि त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारही मिळाला.
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (IND vs SA T20I 2025)
टिळक वर्मा (भारत) – १८७
क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) – १५६
हार्दिक पांड्या (भारत) – १४२
एडन माक्ररम (दक्षिण आफ्रिका) – 110
अभिषेक शर्मा (भारत) – १०३
या मालिकेत गोलंदाजीत भारताकडून वरुण चक्रवर्ती चमकला. त्याने चार सामन्यांत 10 विकेट्स घेत सर्वाधिक बळी मिळवण्याचा मान पटकावला. पाचव्या टी-20 मध्ये त्याने 4 विकेट्स घेत सामना भारताच्या बाजूने वळवला. उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ पुरस्कार देण्यात आला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने चार सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या, मात्र वरुणपेक्षा तो 4 विकेट्सनी मागे राहिला.
सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (IND vs SA T20I 2025)
वरुण चक्रवर्ती (भारत) – १०
लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका) – 6
ओटनेल बार्टमॅन (दक्षिण आफ्रिका) – 5
अर्शदीप सिंग (भारत) – ५
जसप्रीत बुमराह (भारत) – ४
लुथो सिपामला (दक्षिण आफ्रिका) – 4
Comments are closed.