क्रिकेटनामा – सूर्याने उगवणं क्रमप्राप्त!

>>संजय कऱ्हाडे

फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठीचा संघ काल जाहीर झाला. दीड महिना आधी! मला हे आवडलं. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होईपर्यंत आपल्याला न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामने खेळायला मिळणार आहेत अन् त्या मालिकेदरम्यान खेळताना प्रत्येक खेळाडू मनमोकळेपणाने खेळू शकेल हा विचार पटलाय!

आपल्या संघामधली चार नावं मला फार उत्साह देतायत – अभिषेक, जबरदस्त सलामीवीर. हार्दिक, उत्कृष्ट अष्टपैलू. वरुण, फिरकीचा जादूगार आणि बुमरा आजचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज! त्यांना साथ देण्यासाठी असतील ईशान आणि तिलक. अभिषेकच्या साथीने ईशानला संधी द्यावी असं माझं मत. संजू बुजुर्ग आहे हे खरं, पण जो धुमाकूळ ईशानने स्थानिक क्रिकेटमध्ये घातलाय ते पाहता तरुण ईशानला प्रथम संधी द्यावी. ईशानचं स्वागत आहे!

चौथ्या क्रमांकावर सूर्या ठीक. पण त्याच्याएवढय़ा संधी मिळाल्या असत्या तर आज पन्नाशीत असणारे बरेच खेळाडू आजही संघात दिसले असते असं वाटून गेलं एवढंच! आता न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटी मालिका सुरू व्हायला बरोब्बर एक महिना आहे. यादरम्यान सूर्याने नेटमध्ये जाणं, समविचारी अन् तज्ञ फलंदाजांशी बोलणं आणि मनातलं काहूर झटकून उरात नवा आत्मविश्वास भरण्याची गरज आहे. कुणी सांगावं, यादरम्यान बॅटीतून न आलेल्या सर्व धावा सूर्या विश्वचषकांत फटकावण्यासाठी साठवून ठेवतोय, असं सुनील गावसकरचं म्हणणं खरं व्हायचं असेल! सूर्याने लवकरात लवकर उगवणं क्रमप्राप्त होऊन बसलंय!

पाचव्या क्रमांकावर हार्दिकला तोड नाही. आपण त्याचे साक्षीदार आहोत. मग अक्षर, रिंकू, वरुण, अर्शदीप, बुमरा. अन् त्यानंतर हर्षित किंवा शिवम किंवा सुंदर! शिवाय, संजू, कुलदीपसारखे हिरे समतोल राखण्यासाठी अन् संघाचा एकूण सूर-ताल जमवण्यासाठी हाताशी असणं ही तर चैन झाली!

शुभमन संघाबाहेर झाला याचा त्याने अन् त्याच्या चाहत्यांनी बाऊ करण्यात अर्थ नाही. त्याला पुरेशी संधी मिळाली. खरं सांगायचं तर इंग्लंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर कसोटीप्रमाणे वन डे संघाचं नेतृत्व त्याला मिळालं आणि हर प्रकारच्या क्रिकेटचा हीरो अशी त्याची भलामण केली गेली. आयपीएलमध्ये त्याने तसा लौकिकसुद्धा मिळवला होता, मात्र अचानकपणे त्याच्या खांद्यावर आलेल्या जिम्मेदारीने तो झुकला, वाकला! अर्थात, त्याने हार मानू नये. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघाची निवड वेगळय़ाने होणार आहे. त्या संधीची फांदी पकडून त्याला नव्याने झोका घेता येईल. किमान तसा प्रयत्न तरी त्याला करता येईल!

Comments are closed.