उमेद – देशसेवेचे व्रत घेतलेले मिलिटरी अपशिंगे
>> पराग पोतदार
सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून या जिह्याचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. याच जिह्यातील एक गाव लष्करी अपशिंगे. या गावाचे नाव ऐकताच मनात शिस्त, शौर्य व समर्पणाची भावना जागृत होते. मुंबई – बंगळुरू महामार्गावर असणारे हे गाव म्हणजे भारतीय सैन्याच्या गौरवशाली परंपरेचा जिवंत इतिहास आहे.
सातारा जिह्यातील गाव मिलिटरी अपशिंगे. या नावातच देशसेवेचे व्रत आहे. या गावातील प्रत्येक घरातील एक जण सैन्यात किंवा सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. या गावात 1650 पेक्षा अधिक जवानांनी सैन्यात आणि इतर सुरक्षा दलात सेवा बजावली आहे.
पहिल्या महायुद्धापासून ते कारगील युद्धापर्यंत येथील अनेक सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलंय. इंग्रजांच्या काळात पहिल्या महायुद्धात या गावातील 46 जवान शहीद झाले होते. त्यामुळे इंग्रजांनी या गावाचे नाव मिलिटरी अपशिंगे असे ठेवले. दुसऱ्या महायुद्धातही गावातील चार जण शहीद झाले. 1962 मधील युद्धात चार आणि 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात एक-एक जवान शहीद झाला होता.
सातारा जिह्यातील अनेक गावांतील अनेक जण सैन्यात आणि सुरक्षा दलात आहेत. हे जवान मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, इंजिनीअर रेजिमेंट, मद्रास रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. तसेच नौदल, हवाई दल, बीएसएफ, सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांत मोठय़ा संख्येने जिह्यातील जवान सेवा बजावत आहेत. येथील एका कुटुंबातील 23 जणांनी सैन्यात सेवा दिली आहे. 81 वर्षांचे निवृत्त कॅप्टन लक्ष्मण कारंडे यांचे ते कुटुंब असून त्यांची चौथी पिढी सैन्यात आहे. पुतण्या विश्वास मेजर जनरल पदापर्यंत पोहोचला आहे.
अपशिंगे गावात एक विजयस्तंभ आहे. हा गावच्या इतिहासाचा वारसा सांगणारा साक्षीदार आहे. विजयस्तंभाच्या पाठीमागच्या बाजूला गावातील सैनिकांच्या पराक्रमाचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळात पहिलं महायुद्ध झालं तेव्हा या गावातील 46 सैनिक शहीद झाले होते. त्याची शिळा विजयस्तंभावर लावण्यात आली आहे. 1962 मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात गावातील चार जवान शहीद झाले. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेले सुभेदार दिनकर भैरू पवार यांची नावेदेखील येथे आहेत. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेमध्ये गावातील चार जण सहभागी होते. या विजयस्तंभाला भेट दिल्यानंतर या गावाचा इतिहास आणि वारसा लक्षात येतो. हाच वारसा सध्याची पिढीदेखील पुढे चालवत असून अनेक तरुणांचा कल सैन्यात जाण्याकडेच आहे.
अपशिंगे गावचे लष्करातील योगदान पाहून भारतीय लष्करातर्फे गावाला रणगाडा भेट दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 14 ऑगस्ट 2023 मध्ये ग्रामपंचायतीने शहीदांच्या नावांनिशी स्वतंत्र स्मारक उभारून हा रणगाडा ठेवला आहे.
मुलांच्या जन्मापासूनच त्यांचं सैन्यात जाण्यासाठीचं ट्रेनिंग या ठिकाणी सुरू होतं. येथील गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात मुलांना परेड, ड्रिल शिकवले जाते. याविषयी नववीच्या सौरभ निकमचे म्हणणे आहे की, गावाचे ब्रीदवाक्यच आहे…‘इथे घडती वीर जवान’. या गावात अशीही काही कुटुंबे आहेत की, संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब सैन्यात सामील आहे. सर्वच मुले सैन्यात, असं हे सैनिकांचं गाव जगाच्या नकाशावर अगदी लहान दिसत असलं तरी या गावाचं कार्य फार महान आहे. याविषयी सैन्यातून कॅप्टन पदावरून निवृत्त झालेले शंकरराव देशमुख यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने शिक्षकाचा मुलगा शिक्षक आणि इंजिनीअरचा मुलगा इंजिनिअर बनतो, तसेच अपशिंगे गावात सैनिकी परंपरा आहे.
अग्निवीर शिक्षण केंद्र
केंद्र सरकारने अग्निवीर नियुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर सैन्याची परंपरा असलेल्या अपशिंगे या गावामध्ये अग्निवीर शिक्षण केंद्र आणि व्यायामशाळा सुरू करण्यात आली. या ठिकाणी सैन्य भरतीसाठीचा सराव करून घेतला जात असून गावातील मुले त्याचा लाभ घेत आहेत.
काय आहे गावाचा इतिहास?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात असणारं गाव म्हणजे अपशिंगे मिल्ट्री. अपशिंगे मिल्ट्री हे गाव सातारपासून 18 कि.मी अंतरावर आहे. गावातील प्रत्येक घरातल्या एका तरी व्यक्तीने सैन्यात भरती व्हायचंच असा इकडे अलिखित नियम आहे. या गावातील अनेकांची आडनावे निकम आहेत. ते निकुंभ राजपूत या घराण्याचे वारस असल्याचे सांगितलं जातं. अपशिंगे मिल्ट्रीतील तरुणांना लहानपणापासूनच आर्मीचे धडे मिळतात ते इकडच्या निवृत्त झालेल्या जवानांकडून. त्यामुळे गावाला एक वेगळीच शिस्त आहे. निवृत्त जवानांकडून सैन्याचे बाळकडू मिळाल्यानंतर ते सैनिक शाळेत भरती होतात आणि सीमेवर लढण्यास सज्ज होतात.
Comments are closed.