अंबरनाथमध्ये भाजपचे पैसे वाटप, शिंदे गटाचा बोगस मतदानाचा प्रयत्न; सत्ताधाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्था धाब्यावर, 288 नगर परिषदा-पंचायतींचा आज फैसला

राज्यातील 24 नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीत आज झालेल्या मतदानाच्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवली. अंबरनाथ नगरपरिषदेत पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराच्या लोकांना रंगेहाथ पकडले. तर भाजप आणि कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीतून आणलेल्या तब्बल 200 मतदारांचा पर्दाफाश करत शिंदे गटाचा बोगस मतदानाचा प्रयत्न हाणून पाडला.  यावरून भाजप आणि शिंदे गटात झालेल्या राडय़ामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

राज्यातील 24 नगर परिषदा, नगर पंचायती तसेच 154 सदस्यपदांसाठी मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत 47.04 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. मतदानासाठी निवडणूक आयोगाने सर्व सज्जता ठेवली होती. सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवला होता, पण तरीही मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणी गोंधळ, आरोप-प्रत्यारोप, मारामारी, पोलिसांचा लाठीमार असे चित्र बघायला मिळाले.

महिला मतदार नजरपैदेत

नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानासाठी निघालेल्या गोरोबाकाका मंदिरात शेकडो मतदारांना कोंडून ठेवत आले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पैशाचे आमिष दाखवून सकाळपासून मंगल कार्यालयात बोलावले. भाजपचे आमदार राजेश पवार यांचा फोटो असलेल्या मोटारीतून कार्यकर्ते पळून गेल्याचे सांगण्यात येते. पोलीस येताच काही पदाधिकाऱ्यांनी उंच भिंतीवरून उडय़ा मारून पळ काढल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. धर्माबादमध्ये बोगस महिला मतदाराला पकडून चोप दिला. तेलंगणातून मतदार आणल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

चार हजार रुपयांना एक मत

नांदेडच्या गोरोबाकाका मंदिरात पहाटे 5 वाजल्यापासून मतदारांना डांबून ठेवले होते, तर काही महिलांना रात्रीपासून डांबून ठेवले होते. चार हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले असे या ठिकाणी कोंडून ठेवलेल्या महिलांनी टीव्ही चॅनेलशी बोलताना सांगितले.

आयोगाची क्लीन चिट

धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याच्या घटनेवर निवडणूक आयोगाने खुलासा केला असून असा कोणताही प्रकार घडला नाही असा दावा केला आहे. धर्माबाद येथील ईनानी मंगल कार्यालयात आयोगाच्या पथकाने पोलिसांसह भेट दिली असता या ठिकाणी कोणतेही नागरिक आढळून आले नाही. या ठिकाणी कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही असे धर्माबादच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नांदेडचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

पोलिसांसोबत बाचाबाची

भुसावळमध्ये पोलीस आणि उमेदवारामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भावना पवार यांना मतदान केंद्रात जाऊ दिले नाही. त्यावरून बाचाबाची झाली.

सत्ताधारीच परस्परांना भिडले

कोपरगावमध्ये सत्ताधारी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच राडा झाला. मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यावर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदान केंद्रावर गोंधळ भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.

शिंदेंच्या उमेदवारावर गुन्हा

भिवंडीतून बोगस मतदानासाठी आणलेल्या 208 महिलांना कृष्णा मॅरेज हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. या हॉलचा मालक कृष्णा रसाळ हा शिंदे गटाचा उमेदवार असून त्याच्यासह यापैकी 174 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.