पश्चिम बंगालमध्ये आयोग घेणारे सरकार

पंतप्रधान मोदी यांचा घणाघात, केंद्राने दिले अनेक प्रकल्प, पण राज्य सरकारने नेहमीच घातला मोडता

वृत्तसंस्था / कोलकाता

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार कम्शिनखोरी करत आहे. त्यामुळे लोकांपर्यंत विकासाची फळे पोहचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. आजवर केंद्र सरकारने या राज्यासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प देऊ केले आहेत. तथापि राज्य सरकारने या प्रकल्पांमध्ये मोडता घालून राज्यातील सर्वसामान्य जनतेची अपरिमित हानी केली आहे, अस घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

पश्चिम बंगालमधील ताहिरपूर येथील नेताजी उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते भाषण करीत आहे. या कार्यक्रमासह त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले, असे मानण्यात येत आहे. या राज्यात येत्या एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

अडकले अनेक प्रकल्प

गेल्या 11 वर्षांमध्ये केंद्र सरकारने पश्चिम बंगालकरिता अनेक प्रकल्पांची घोषणा केली होती. तथापि, राज्य सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. केंद्राचे प्रकल्प आपल्या राज्यात आल्यास केंद्र सरकारची लोकप्रियता वाढेल आणि या वाढत्या लोकप्रियतेचा लाभ भारतीय जनता पक्षाला होईल. मग आपले कसे होणार, ही भीती तृणमूल काँग्रेसला सतावते. जनता प्रकल्पांपासून वंचित राहिली तरी चालेल, पण आपल्याला सत्ता मिळत राहिली पाहिजे, अशी संकुचित विचारसरणी या पक्षाची आहे. तथापि, लोक आता अशा डावपेचांना भीक घालणार नाहीत, असे प्रतिपादन त्यांनी केले. नकारात्मक राजकारणावर त्यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली.

माझा करा हवा तेवढा विरोध

पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने माझा विरोध जेवढा पाहिजे तेव्हढा करावा. एकदा नाही, हजारवेळा करावा. तथापि स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी राज्यातील जनतेची हानी करु नये. पण राज्य सरकार नेमक्या याच मार्गाने चालत आहे.  आता या राज्यातील जनता या कारस्थानाला फसणार नाही. राज्याच्या प्रगतीत कोणाचा अडथळा आहे, हे येथील मतदारांच्या लक्षात आले असून ते आगामी विधानसभा निवडणुकीत याचा जाब विचारतीलच, असे प्रतिपादन त्यांनी केले.

राष्ट्रीय प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रचंड जाहीर सभेच्या आधी 3 हजार 200 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन केले. पश्चिम बंगालसाठी या  राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा मोठा लाभ होणार आहे. या राज्याचा इतर भारताशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क यावा यासाठी हे महामार्ग प्रकल्प आवश्यक आहेत. या प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाची गती वाढणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. राज्यात एसआयआर प्रक्रियेनंतरचे हे त्यांचे प्रथमच जाहीर भाषण होते.

गुवाहाटीत विमान टर्मिनलचे उद्घाटन

पश्चिम बंगालमध्ये भाषण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्याचा प्रारंभ झाला. आसाममध्ये त्यांनी राजधानी गुवाहाटीत ‘लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल  बिल्डिंगचे उद्घाटन केले. हा देशातील प्रथमच निसर्गस्नेही विमानतळ आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारीही आसाममध्येच असून ते 15 हजार 600 कोटी रुपयांच्या एका महाप्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर ते दिल्लीला परतणार आहेत. विमानतळाच्या टर्मिनल उद्घाटन प्रसंगी आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. हा निसर्ग आणि पर्यावरण स्नेही विमानतळ असून आसामच्या निसर्गसौंदर्याचे दर्शन या विमानतळावर होते. अशी संकल्पना या विमानतळाच्या रुपाने भारतात प्रथमच साकारली आहे, अशी प्रतिक्रिया अनेक तज्ञांनी या संदर्भात व्यक्त केली आहे.

निवडणूक प्रचाराचा प्रारंभ

‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण अभियानानंतरची प्रथमच जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विधानसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ

राज्य सरकारच्या अडथळ्यांमुळे पश्चिम बंगालच्या प्रगतीत मोठा अडथळा

आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनलचा प्रारंभ

Comments are closed.