रेल्वे प्रशासनाच्या दडपशाहीविरुद्ध एल्गार, पश्चिम रेल्वेचे मोटरमन, ट्रेन मॅनेजर आंदोलनाच्या पवित्र्यात

रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार आणि कर्मचाऱयांवरील वाया दबावाविरोधात पश्चिम रेल्वेचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. लोकल ट्रेनचे सारथ्य करणाऱ्या मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रशासनाला देत रेल्वे कर्मचाऱयांच्या सर्व संघटनांनी एकजूट दाखवली आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकातील लॉबीमध्ये मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर या कर्मचाऱयांनी निषेध बैठक पार पडली. रेल्वे प्रशासनाचा सततचा मनमानी कारभार आणि रनिंग स्टाफवरील वाया दबावाचा बैठकीत निषेध करण्यात आला. यावेळी मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरना नियमित सुट्टय़ा न देणे, डबल डय़ुटी करण्यास भाग पाडून मानसिक आणि शारीरिक छळ करणे तसेच गेल्या सात महिन्यांपासून चर्चगेट येथील मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरचे कॅन्टीन बंद करणे आदी प्रमुख विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अपुऱया मनुष्यबळामुळे कामाचा अतिरिक्त ताण असताना रेल्वे प्रशासन मनमानी कारभार करून मानसिक आणि शारीरिक छळ करीत असल्याच्या विरोधात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचे ठरवण्यात आले. डबल डय़ुटी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे कर्मचाऱयांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत आहे, असा दावा कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. जर प्रशासनाने मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे. बैठकीला मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरसह कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.