विमान धावपट्टी परीक्षा केंद्र

कोणतेही लेखी परीक्षाकेंद्र हे बंदिस्त असले पाहिजे, अशी आपली समजूत आहे. शाळा किंवा महाविद्यायलयाच्या एखाद्या वर्गात ही लेखी परीक्षा दिली जाते. तथापि, ओडीशा राज्यात एक अशी घटना घडली आहे, की साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या राज्यातील जामदारपाली येथे चक्क विमानाच्या धावपट्टीवर लेखी परीक्षा घेण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांनी ती परीक्षा उघड्या आकाशात दिली आहे. ही परीक्षा गृहरक्षकदलाच्या भर्तीसाठी होती. 8 हजारांहून अधिक इच्छुक या परीक्षेसाठी एकत्र आले होते. या परीक्षेसाठी प्रशासनाला शाळा किंवा महाविद्यालयांचे वर्ग इतक्या मोठ्या संख्येने उपलब्ध होण्याची शक्यता नव्हती. पण या गावात विमानतळाचे बांधकाम करण्यात येत असून विमानांच्या उ•ाणांसाठी किंवा अवतरणांसाठी धावपट्टीची निर्मिती करण्यात आली होती. विमानाची धावपट्टी बरीच लांबलचक आणि रुंदही असते. त्यामुळे प्रशासनाला लेखी परीक्षेसाठी हे स्थान योग्य वाटले. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांना या धावपट्टीवरच रांगेने बसविण्यात आले, धावपट्टी मोठी असल्याने सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा एकाच वेळी घेणे शक्य झाले. त्यामुळे सकाळी 10 वाजण्याच्या आसपास मोकळ्या आकाशाखाली विमानाच्या धावपट्टीवर ही परीक्षा घेण्यात आली. इच्छुकांनी धावपट्टीवर बसून ही परीक्षा दिली आहे. या परीक्षेचे वैशिष्ट्या असे, की इच्छुकांची किमान आर्हता केवळ 5 वी इयत्ता उत्तीर्ण इतकीच आहे. तथापि, या परीक्षेला बी. टेक. ही अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेले युवकही आले होते. इतकेच नव्हे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले इच्छुकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ पाचवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अगदीच कमी होती, असेही स्पष्ट झाले आहे. एकंदर सध्या ही परीक्षा हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे. विमानाच्या धावपट्टीवर लेखी परीक्षा होण्याचा हा जगातील आतापर्यंतचा प्रथम प्रकार असणे शक्य आहे.

Comments are closed.