एक क्विंटल किती आहे?
एक क्विंटल म्हणजे किती, या प्रश्नाचे उत्तर निश्चित आहे. एक क्विंटल याचा अर्थ 100 किलो असाच जगभर होतो. तथापि, बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात 1 क्विंटल म्हणजे 100 किलो न होता, 120 किलो होतात, असे मानले जाते. या जिल्ह्यात अनेक स्थानी अजूनही किलो किंवा क्विंटल हे वजन न मानता, जुने आणि आता कालबाह्या झालेले ‘मण’ हे वजन मानले जाते. तसेच एक क्विंटल म्हणजे तीन मण असा हिशेब केला जातो. एका मणाचे सध्याच्या वजनाच्या प्रमाणात साधारणत: 40 किलो असा हिशेब केला जातो. त्यामुळे 3 मणांचे 120 किलो होतात, असे या जिल्ह्यात मानले जाते आणि तसाच हिशेब केला जातो. मधुबनी जिल्हा बिहारच्या ‘मिथिलांचल’ या प्रदेशात येतो. येथे ‘मखना’ नामक पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पौष्टिकतेच्या दृष्टीने ते जगातील सर्वोत्तम मानले जाते. भारतासह जगभरात या कृषी उत्पादनाला प्रचंड मागणी आहे.
या मखनाचे वजन बहुतेकवेळा मणातच केले जाते. त्यामुळे एक क्विंटल म्हणजे 120 किलो हा हिशेब येथील मखना शेतकऱ्यांच्या मनात पक्का बसला आहे. त्यामुळे मखना विकत घेणारे व्यापारी आणि त्याचे उत्पादन घेणारे शेतकरी यांचे अनेकदा वाद होतात. व्यापारी 3 मण मखनाला 100 किलो मानतात आणि त्याप्रमाणे किंमत देतात. तथापि, या व्यवहारात व्यापाऱ्यांना 20 किलोचा लाभ प्रत्येक तीन मणांमागे होतो. शेतकरी व्यापाऱ्यांकडे 120 किलोची किंमत मागतात. मखना हे उत्पादन अतिशय महाग असल्याने 20 किलो अधिक वजनातून लाभही प्रचंड प्रमाणात मिळतो. शेतकऱ्यांना हा हिशेब माहिती असल्याने ते व्यापाऱ्यांकडे त्यानुसार पैसे मागतात. पण व्यापारी क्विंटल म्हणजे 100 किलो असे समजून तीन मणांचे पेसे देतात. हा घोटाळा मण हे जुने परिमाण आजही मानले जात असल्यामुळे होत आहे. आता शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचेही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येथील व्यापारीही आता या संबंधात सहकार्य करु लागले आहेत, असे दिसून येते. मखना हा पदार्थ जितका प्रसिद्ध आहे, तितकाच अलिकडच्या काळात हा वादही प्रसिद्ध होऊ लागला आहे. आता हा हिशेब सुधारला जात असला, तरी आतापर्यंत व्यापारी 120 किलो मखनाचे 100 किलो प्रमाणेच पैसे देत होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता यात सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी आहे.
Comments are closed.