फोटोग्राफीतील ‘विश्वविजेता’! अमेरिकेतील मानाच्या ‘रिफोकस वर्ल्ड अवॉर्ड’वर बैजू पाटील यांचे नाव

निसर्गाच्या अफाट विश्वातील एक ‘दुर्मिळ क्षण’ टिपण्यासाठी तब्बल १५ दिवस केलेला संयमी पाठलाग अखेर फळाला आला आहे. अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड २०२५’ मध्ये सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावून जागतिक स्तरावर देशाची मान उंचावली आहे. १०९ देशांतील हजारो दिग्गज छायाचित्रकारांना मागे टाकत पाटील यांनी मिळवलेले हे यश भारतीय छायाचित्रण क्षेत्रातील ऐतिहासिक सुवर्णक्षण ठरले आहे.

भरतपूरच्या जंगलातील तो ‘थरारक’ क्षण

राजस्थानातील भरतपूर अभयारण्यात बैजू पाटील यांनी एका अशा संघर्षाची गाथा कॅमेर्‍यात कैद केली, जी पाहून जागतिक स्तरावरील परीक्षकही थक्क झाले. या फोटोत पाण्याखाली शिकार करणारा ‘स्नेक बर्ड’ आणि त्याच्या चोचीतील मासा हिसकावण्यासाठी आकाशातून झेप घेणारा ‘ग्रे हेरॉन’ (राखाडी बगळा) यांच्यातील हा अटीतटीचा संघर्ष बैजू यांनी बेमालूमपणे टिपला आहे. हा एका सेकंदाचा क्षण टिपण्यासाठी पाटील यांनी १५ दिवस एकाच जागी बसून निसर्गाच्या हालचालींचा अभ्यास केला आणि अखेर त्यांनी हा अविश्वसनीय क्षण कॅमेर्‍यात वैâद केला. त्यांच्या या ‘स्नेक बर्ड अँड ग्रे हेरॉन’ या छायाचित्राला जगातील सर्वोत्तम कलाकृतीचा बहुमान मिळाला आहे.

‘कॅमेरा बोलत नाही, तो निसर्गाला ऐकतो!’

हे यश माझे नसून, भारतीय निसर्गाचे आहे. ३७ वर्षांच्या प्रवासात मी शिकलो की, जंगलात गेल्यावर तुम्ही शांत राहायचे असते, निसर्ग स्वतःहून तुमच्याशी संवाद साधतो. हा पुरस्कार माझ्या देशातील आगामी पिढीला निसर्ग संवर्धनासाठी प्रेरित करेल, अशी सोज्वळ प्रतिक्रिया यावर्षी पाच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे बैजू पाटील यांनी दिली.

३७ वर्षांची तपश्चर्या आणि ‘निसर्ग ओळखा’ अभियान

बैजू पाटील हे केवळ छायाचित्रकार नसून ते निसर्गाचे अभ्यासक आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एम.जी.एम. विद्यापीठात कार्यरत असताना त्यांनी हजारो तरुणांना कॅमेर्‍याच्या माध्यमातून पर्यावरणाशी जोडले आहे. त्यांनी सुरू केलेले ‘निसर्ग ओळखा’ अभियान महाराष्ट्रात घराघरांत पोहोचले असून, आता ते ‘निसर्ग वाचा, निसर्ग जपा’ हे राष्ट्रीय अभियान सुरू करणार आहेत.

जगभरातून कौतुकाचा वर्षाव

आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या ‘टाइम्स ऑफ फोटो’ आणि ‘वाईल्ड वॉचर’ सारख्या जागतिक नियतकालिकांनी पाटील यांच्या कार्याची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या यशाचे वर्णन ‘भारतीय वन्यजीव क्षेत्राचा गौरव’ असे केले असून, लवकरच त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या निकालाची घोषणा होताच बैजू पाटील यांचे ट्विटर आणि इंस्टाग्राम हे हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये राहिले. या पुरस्काराबद्दल बैजू पाटील यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments are closed.