सूर्यकुमार यादवचे खराब फॉर्मवर मोठे विधान, सांगितले कसं करणार धमाकेदार पुनरागमन!

भारतीय संघ टी-20 फॉरमॅटमध्ये सातत्याने विजय मिळवत आहे, मात्र यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. सूर्या गेल्या एका वर्षापासून सातत्याने आपल्या फलंदाजीच्या क्रमात बदल करत आहे, पण त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होताना दिसत आहे. एकेकाळी टी20 फॉरमॅटमध्ये जगातील नंबर 1 फलंदाज राहिलेला सूर्या आता मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरत आहे. दरम्यान, एका कार्यक्रमात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या खराब फॉर्मबाबत मोठे विधान केले आहे.

2026 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड झाली असून, खराब फॉर्म असूनही सूर्यकुमार यादवच या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. जीएलएस युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमात आपल्या फॉर्मबद्दल बोलताना कर्णधार सूर्या म्हणाला, ‘माझ्या मते, खेळ खूप काही शिकवतो आणि प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा एक टप्पा येतो जेव्हा त्याला वाटते की तो काहीतरी शिकत आहे, त्यामुळे हा माझ्यासाठी शिकण्याचा काळ आहे… पण माझे 14 खेळाडू माझ्या जागी जबाबदारी सांभाळत आहेत. जेव्हा मी आक्रमक खेळी करेन तेव्हा काय होईल, हे त्यांना ठाऊक आहे. मी खूप सकारात्मक आहे आणि कठोर मेहनत घेत आहे, मला खात्री आहे की तुम्हीही तेच कराल. जर आपल्याला परीक्षेत चांगले गुण मिळाले नाहीत, तर आपण अभ्यास सोडत नाही. आपण अधिक गुण मिळवण्यासाठी पुन्हा मेहनत करतो. मी सुद्धा तेच करत आहे.’

2026 च्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात (21 जानेवारी 2026) रोजी होईल, तर मालिकेतील शेवटचा सामना 31 जानेवारीला खेळवला जाईल. दुसरीकडे, टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आपला पहिला सामना 7 फेब्रुवारीला खेळणार आहे. अशा परिस्थितीत, कर्णधार सूर्यकुमार यादवला फॉर्ममध्ये परतण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत धावांचा पाऊस पाडावा लागेल. सूर्याचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज सध्या चांगल्या लयीत दिसत आहेत.

Comments are closed.