टी20 वर्ल्ड कप या मोठ्या कारणामुळे हारू शकतो भारत! समोर आली मोठी कमकुवत बाजू

2026 च्या टी20 विश्वचषकासाठी भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. याशिवाय, भारतीय संघ सध्याचा डिफेंडिंग चॅम्पियन असल्याने त्यांचे पारडे जड आहे.

बीसीसीआयने (BCCI) 2026 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून, या संघात अनेक युवा स्टार खेळाडूंचा भरणा आहे. मात्र, इतकी मजबूत बाजू असतानाही भारतीय संघाची एक मोठी कमकुवत बाजू समोर आली आहे. जर वेळेत या कमतरतेवर काम केले नाही, तर 2026 च्या विश्वचषकाची ट्रॉफी भारतीय संघाच्या हातातून निसटू शकते.

भारतीय संघाला 2026 चा टी20 विश्वचषक सूर्यकुमार यादवच्याच नेतृत्वाखाली खेळायचा आहे. कर्णधार म्हणून त्याची आकडेवारी जरी उत्कृष्ट असली, तरी एक फलंदाज म्हणून सूर्या सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. गेल्या 25 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.

नोव्हेंबर 2024 मध्ये हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने शेवटची अर्धशतकी खेळी खेळली होती. त्यानंतर मात्र त्याच्या फलंदाजीतील सातत्य हरवलेले दिसत आहे. आशिया चषक 2025 दरम्यानही सूर्या आपल्या फलंदाजीने छाप पाडू शकला नव्हता. तसेच, नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याने केवळ 22 धावा केल्या, ज्यामध्ये 17 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. अशा परिस्थितीत, सूर्याच्या या खराब फॉर्ममुळे भारतीय संघाचे 2026 चा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहू शकते.

आपल्या खराब फॉर्मबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “मला माहित आहे की मला काय करायचे आहे आणि मी ते नक्कीच करेन. तुम्ही लवकरच जुन्या फलंदाज सूर्यकुमारला पहाल. हा खराब फॉर्मचा काळ थोडा लांबला आहे, पण यापूर्वीही अनेक खेळाडूंनी अशा खराब फॉर्ममधून दमदार पुनरागमन केले आहे.”

Comments are closed.