भारताच्या यशातून पाकिस्तान घेतोय धडा! आकिब जावेद यांनी केला मोठा खुलासा
पाकिस्तानचे निवडकर्ते आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आकिब जावेद यांनी खुलासा केला आहे की, ते भारताच्या यशाच्या गाथेचे अनुकरण करत आहेत आणि त्यांनी आपल्या देशातही ते लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाने गेल्या वर्षी टी20 विश्वचषक, या वर्षाच्या सुरुवातीला दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी आणि सप्टेंबरमध्ये आशिया चषक जिंकला. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) एका पॉडकास्टमध्ये माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद म्हणाले, “मी भारताचे यश पाहिले आहे आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सुधारणेसाठी त्या योजना लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही क्रिकेट खेळणाऱ्या देशाचे यश हे तिथल्या खेळाडूंच्या प्रतिभेवर अवलंबून असते.”
त्यांनी आठवण करून दिली की, 2006 मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानचा दौरा केला होता, तेव्हा भारतीय संघातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लाहोरच्या एलसीसीए (LCCA) मैदानाची पाहणी करण्याची विनंती केली होती, कारण त्या काळात या मैदानाला या क्षेत्रातील एक अग्रगण्य अकादमी मानले जात होते. ते पुढे म्हणाले, “मला असे वाटते की, आपण आपल्या क्रिकेट प्रणालीमध्ये मूलभूत गोष्टी योग्य प्रकारे करण्यामध्ये मागे पडलो आहोत. तुम्ही कोणालाही कर्णधार, प्रशिक्षक किंवा निवडकर्ता म्हणून नियुक्त करा, जोपर्यंत तुमच्याकडे प्रतिभावान खेळाडू नसतील तोपर्यंत काहीही बदलणार नाही. प्रतिभेचा दर्जा हा ‘बेंच स्ट्रेंथ’ आणि स्पर्धा वाढवूनच सुनिश्चित केला जाऊ शकतो आणि हे केवळ योग्य पायाभूत सुविधा आणि प्रणालीमुळेच शक्य आहे.”
आकिब जावेद अलीकडच्या काळापर्यंत पाकिस्तान संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक देखील होते. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, पाकिस्तानचे क्रिकेट आता योग्य दिशेने वाटचाल करत आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या टी20 विश्वचषक आणि आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांबाबत विचारले असता ते म्हणाले की, जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी पाकिस्तानसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.
आकिब म्हणाले, “आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांनी एकमेकांशी उत्तम ताळमेळ बसवला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आमच्याकडे खेळाडूंचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.” आगामी विश्वचषकात पाकिस्तानसाठी सर्वात मोठा फायदा हा आहे की, ते आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले. आकिब म्हणाले, “जर विश्वचषक ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेत असता, तर माझे मत वेगळे असते. परंतु, संघासाठी चांगली कामगिरी करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे.”
Comments are closed.