शुबमन गिलला संघात स्थान न मिळाल्यानंतर गावस्कर यांनी केले मोठे विधान, म्हणाले….

येत्या 2026 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या 15 सदस्यीय संघात शुबमन गिलला स्थान देण्यात आलेले नाही. गिलच्या जागी अक्षर पटेलची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेत गिलची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. मात्र, असे असूनही भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर गिलच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. शुभमनला संघातून वगळणे खूपच आश्चर्यकारक असून त्याला संघात स्थान मिळायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सुनील गावस्कर म्हणाले, “गिलची वर्ल्ड कप संघात निवड न होणे अत्यंत आश्चर्यकारक आहे. गिल हा एक क्लासिक आणि शानदार फलंदाज आहे, ज्याची टी20 वर्ल्ड कपनंतरची कामगिरी थक्क करणारी राहिली आहे. मान्य आहे की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या काही सामन्यांमध्ये तो संघर्ष करताना दिसला होता. मात्र, ‘क्लास परमानेंट असतो आणि फॉर्म टेम्परेरी’. त्याचबरोबर, गिल प्रदीर्घ विश्रांतीनंतर परतला होता आणि तो लयीत नव्हता. जेव्हा तुम्ही टी20 क्रिकेटमध्ये लयीत नसता, तेव्हा तुम्हाला खूप अडचणी येतात. टी20 मध्ये ज्या शॉट्सची गरज असते, ते इतक्या सहजपणे खेळता येत नाहीत.”

गावस्कर यांनी सांगितले की, ते अहमदाबादहून निघालेल्या विमानामध्ये गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबतच होते. गिलशी चर्चा करताना त्यांनी भारतीय फलंदाजाला एक महत्त्वाचा सल्ला दिल्याचेही गावस्कर यांनी नमूद केले. गावस्कर म्हणाले की, त्यांनी गिलला सांगितले की, त्याने घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीला स्वतःची ‘दृष्ट’ (नजर) काढायला सांगावी. गावस्करांच्या मते, कधीकधी खेळाडूंना नजर देखील लागते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत गिल खूप संघर्ष करताना दिसला होता. पहिल्या सामन्यात तो केवळ 4 धावा करून बाद झाला होता, तर दुसऱ्या टी20 सामन्यात त्याला आपले खातेही उघडता आले नव्हते. तसेच, तिसऱ्या सामन्यात त्याने 28 चेंडूत 28 धावा केल्या होत्या.

Comments are closed.