पुण्याची डबल फायनल, महिलांमध्ये धाराशीव तर पुरुषांमध्ये उपनगरशी भिडणार

61 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुण्याने दोन्ही गटांत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता महिला गटात धाराशीव पुरुषांमध्ये मुंबई उपनगरविरुद्ध ते जेतेदासाठी भिडतील. चारही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा भरणा असल्याने हे अंतिम सामने कमालीचे चुरशीचे होण्याची अपेक्षा आहे.
धाराशीवने उडवला नाशिकचा धुव्वा
महिला गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात धाराशीवने नाशिकचा एक डाव व 10 गुणांनी (26-16) धुव्वा उडवत रुबाबात अंतिम फेरी गाठली. धाराशीवकडून संध्या सुरवसे (3.10 मि. संरक्षण), अश्विनी शिंदे (2.30 मि. संरक्षण व 4 गुण), मैथिली पवार (2 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी संघाच्या विजयात धमाकेदार खेळी केला. महिला गटातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुण्याने ठाण्याचा 3 गुण व 50 सेपंद राखून (32-29) निसटता पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही डावांत ड्रीम रनच्या जोरावर पुण्याने 4 गुण मिळवत आघाडी घेतली, तर ठाण्याला केवळ 1 ड्रीम रन गुणावर समाधान मानावे लागले.
पुण्याचा धाराशीववर थरारक विजय
पुरुष गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात पुण्याने धाराशीववर 1.10 मिनिटे राखून 4 गुणांनी (37-33) मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा ठरला. पुण्याकडून शुभम थोरात (1.45, 2.30 मि. संरक्षण व 4 गुण), प्रतीक वाईकर (1.30, 1.30 व 1.40 मि. संरक्षण व 8 गुण), सुयश गरगटे (1.00, 1.30 मि. संरक्षण व 2 गुण), रुद्र थोपटे (8 गुण) यांनी उत्कृष्ट खेळ करताना अंतिम फेरीत पोहचले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरने सांगलीचा 3 मिनिटे 37 सेपंद राखून 2 गुणांनी (36-34) पराभव केला. उपनगरकडून अक्षय भांगरे (2.10 व 1.10 मि. संरक्षण), अनिकेत चेंदवणेकर (1.30, 1.10 मि. संरक्षण व 8 गुण), प्रतीक देवरे (10 गुण), निहार दुबळे (1, 1.06 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत अंतिम फेरीचे दार ठोठावले.

Comments are closed.