सत्ताधाऱ्यांचीच सरशी! भाजप फुगला! 120 नगराध्यक्ष आणि 129 नगर परिषद-पंचायती जिंकल्या, शिंदे आणि अजित पवार गटालाही लॉटरी… काँग्रेसला बळ

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचीच सरशी झाली. महायुतीने विधानसभा निवडणुकांप्रमाणेच पाशवी विजय मिळवला. महायुतीचे 224 नगराध्यक्ष निवडून आले. त्यात भारतीय जनता पक्षाचा आकडा फुगला. एकटय़ा भाजपचे 120 नगराध्यक्ष निवडून आले असून 129 नगर परिषदा व पंचायती त्यांनी जिंकल्या. भाजपचा नगरसेवकांचा आकडा 3302 वर गेला. या निकालात एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटालाही लॉटरी लागली. महायुतीच्या विजयी उमेदवारांची आकडेवारी पाहिली तर विधानसभेची पुनरावृत्ती या निवडणुकीत झाली. काँग्रेसने आपली व्होट बँक कायम राखत या निवडणुकीत चांगले यश मिळवले.

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. महायुतीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला असून एकनाथ शिंदे गटाचे 56 आणि अजित पवार गटाचे 36 नगराध्यक्ष निवडून आले. विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचे 51 नगराध्यक्ष निवडून आले. त्यात काँग्रेसचे 34 तर शिवसेनेचे 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 नगराध्यक्ष निवडून आले.

अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविरुद्ध लढले होते. एकमेकांवर धाडी टाकून, स्टिंग ऑपरेशन करून पैसे वाटपाचा प्रकार उघड करण्याचाही प्रयत्न झाला होता. त्यात अंबरनाथ आणि बदलापुरात भाजपने शिंदे गटाचा सुपडा साफ केला. अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले तर बदलापुरात भाजपच्या रुचिता घोरपडे विजयी झाल्या.

बाहेरच्यांसाठी दरवाजे उघडले, माझी शक्ती माझ्याच पक्षाने काढली

विदर्भातील अनेक नगरपरिषदा भाजपने गमावल्या. त्यावरून ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपला झापले आहे. माझ्या पक्षाने माझीच शक्ती कमी केली. पक्षाचे दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिला त्याचा हा परिणाम आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

संगमनेरात बाळासाहेब थोरातांचा करिश्मा पुन्हा दिसला

संगमनेरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तांबे-थोरात विरुद्ध खताळ-विखे असा दोन प्रभावी राजकीय घराण्यांमध्ये रंगतदार सामना झाला. त्यात काँग्रेसच्या उमेदवार डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी विजयाची नोंद केली. या विजयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा करिश्मा पुन्हा दिसला.

प्रचंड पैसा आणि निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना जिंकवले!

प्रचंड पैसा आणि निवडणूक आयोगानेच सत्ताधाऱ्यांना विजय मिळवून दिला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार व सत्ताधारी पक्षांचा पैसा फेक तमाशा देख असा खेळ या निवडणुकीत पहायला मिळाला. सत्ताधाऱ्यांकडून साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करण्यात आला. बोगस मतदार, दडपशाही, सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा प्रचंड वापर पाहायला मिळाला, असे सपकाळ म्हणाले.

नगरपरिषद-पंचायती

भाजप – 129

शिंदे गट – 51

अजित पवार गट – 33

काँग्रेस – 35

शिवसेना – 8

राष्ट्रवादी – 8

स्थानिक आघाडी – 24

नगराध्यक्ष

भाजप – 120

शिंदे गट – 56

अजित पवार गट – 36

काँग्रेस – 34

शिवसेना – 9

राष्ट्रवादी – 8

स्थानिक आघाडी – 25

नगरसेवक

भाजप – 3325

शिंदे गट – 826

अजित पवार गट – 411

शिवसेना – 170

काँग्रेस – 161

राष्ट्रवादी – 148

स्थानिक आघाडी – 190

Comments are closed.