बांगलादेश सीमेवरून एका बीएसएफ जवानाचे अपहरण करण्यात आले.
जवान वेदप्रकाश सुरक्षित : परतीसाठी वाटाघाटी सुरू
वृत्तसंस्था/ कोलकाता, ढाका
बांगलादेशच्या काही लोकांनी शनिवारी पहाटे भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या एका बीएसएफ जवानाचे अपहरण केले. दाट धुक्याचा फायदा घेत गाय तस्करांनी त्याला घेऊन पलायन केले. तथापि, नंतर या गुन्हेगारांनी त्याला बांगलादेश सीमा रक्षकांच्या (बीजीबी) स्वाधीन केले. दोन्ही देशांमधील चर्चेनंतर, जवानाला परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील कोच बिहार जिह्यातील मेखलीगंज भागात भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शनिवारी पहाटे 4:45 वाजता ही घटना घडली. बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानाचे नाव वेद प्रकाश असे असून तो बीएसएफच्या 174 व्या बटालियनमधी अर्जुन कॅम्पमध्ये तैनात होता. सद्यस्थितीत तो सुरक्षित असून माघारीसाठी वाटाघाटी सुरू आहेत.
कर्तव्यावर असताना जवानांना सीमेच्या एका मोकळ्या भागातून गुरांचा एक कळप भारतीय हद्दीत प्रवेश करताना दिसला. यावेळी तस्करांचा पाठलाग करताना, वेद प्रकाश इतर जवानांपेक्षा पुढे गेला. याचदरम्यान, दाट धुक्यामुळे तो इतर जवानांपासून वेगळा झाला. बांगलादेशी गुन्हेगारांनी परिस्थितीचा फायदा घेत त्याचे बांगलादेशला अपहरण केले. घटनेची माहिती मिळताच, बीएसएफ सेक्टर कमांडरने बीजीबीशी संपर्क साधला. त्यानंतर भारतीय सैनिक सुरक्षित असून सध्या तो बीओपी अंगारपोटा येथे असल्याची माहिती बांगलादेशने बीएसएफला दिली आहे. सदर सैनिकाला पुन्हा भारतात सुरक्षितपणे आणण्यासाठी ध्वज बैठका आणि राजनैतिक चर्चा सुरू आहेत.
Comments are closed.