संरक्षण मंत्रालयातील लेफ्टनंट कर्नलला अटक

सीबीआयची कारवाई : 2.36 कोटी रुपये जप्त : पत्नीचाही सहभाग : खासगी कंपन्यांना मदत केल्याचा आरोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संरक्षण उत्पादन विभागात तैनात लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांना सीबीआयने शनिवारी लाचप्रकरणी अटक केली. बेंगळूर येथील एका कंपनीकडून 3 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात त्यांच्या पत्नीचा सहभागही उघड झाला असून खासगी कंपन्यांना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सीबीआयने केलेल्या या कारवाईनंतर एजन्सीने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून 2.23 कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. तसेच श्रीगंगानगर येथील त्यांच्या पत्नीच्या निवासस्थानातून 10 लाख रुपये जप्त केले.

लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांना 3 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती रविवारी जारी करण्यात आली. कंपनीच्या वतीने लाच देणाऱ्या विनोद कुमार नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे. सीबीआयने अटक केलेल्या दोन्ही आरोपी दीपक शर्मा आणि विनोद कुमार यांना विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी 19 डिसेंबर रोजी दीपक कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी कर्नल काजल बाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. कर्नल काजल बाली ह्या राजस्थानातील श्रीगंगानगर येथील 16 इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डनन्स युनिटच्या कमांडिंग ऑफिसर आहेत.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दीपक शर्मावर संरक्षण उत्पादनांच्या निर्मिती आणि निर्यातीत गुंतलेल्या विविध खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत गुन्हेगारी कट रचल्याचा आणि सतत भ्रष्ट आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. दीपक शर्मा यांनी या कंपन्यांकडून त्यांना अनुचित मदत देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारली. सीबीआयला राजीव यादव आणि रवजीत सिंग यांच्या व्यवस्थापनाखालील बेंगळूरस्थित कंपनीकडून लाच घेतल्याची माहिती मिळाली.  सिंग आणि यादव दोघेही लेफ्टनंट कर्नल शर्मा यांच्याशी नियमित संपर्कात होते. त्यांच्याशी संगनमत करून विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांकडून त्यांच्या कंपनीसाठी अनुचित मदत मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. 18 डिसेंबर रोजी विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने कंपनीच्या वतीने दीपक कुमार शर्मा यांना 3 लाख रुपयांची लाच दिल्याचे सांगण्यात आले. हे प्रकरण संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असल्यामुळे सुरुवातीला याबाबत बरीच गुप्तता पाळण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Comments are closed.