न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर 462 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
कर्णधार लॅथम आणि कॉन्वे यांची दुसऱ्या डावातही शतके
वृत्तसंस्था/ माऊंट माँगेनोई
कर्णधार टॉम लॅथम आणि देवॉन कॉन्वे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सलग दोन्ही डावात शतके झळकाविण्याचा दुर्मीळ पराक्रम नोंदविला. तिसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडने विंडीजला निर्णायक विजयासाठी 462 धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. दिवसअधेर विंडीजने दुसऱ्या डावात 16 षटकात बिनबाद 43 धावा जमविल्या. या कसोटीतील खेळाचा एक दिवस बाकी असून विंडीजचा संघ हा सामना अनिर्णित राखण्यासाठी चिवट फलंदाजी करेल.
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने दुसरी कसोटी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांकडून खेळाच्या चार दिवसांमध्ये 1344 धावा नोंदविल्या गेल्या. फलंदाजीस अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर विंडीजचे फलंदाज शेवटचा दिवस खेळून काढतील असे वाटते.
या सामन्यामध्ये न्यूझीलंडने पहिला डाव 8 बाद 575 धावांवर घोषित केल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 420 धावा जमविल्या. न्यूझीलंडने विंडीजवर पहिल्या डावात 155 धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर विंडीजने 6 बाद 381 या धावसंख्येवरुन रविवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 128.2 षटकात 420 धावांवर आटोपला. केव्हिन हॉजने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 275 चेंडूत 15 चौकारांसह नाबाद 123 धावा झळकाविल्या. किंगने 10 चौकारांसह 63, कॅम्पबेलने 7 चौकारांसह 45, अॅथनेझने 8 चौकारांसह 45, ग्रीव्ह्सने 6 चौकारांसह 43 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे डफीने 4, एजाझ पटेलने 3, मिचेल रे ने 2 आणि डॅरियल मिचेलने 1 गडी बाद केला.
155 धावांची आघाडी घेतल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावालाही दमदार सुरुवात केली. कर्णधार लॅथम आणि कॉन्वे या सलामीच्या जोडीने 39.3 षटकात 192 धावांची शतकी भागिदारी केली. या जोडीने पहिल्या डावात 323 धावांची त्रिशतकी भागिदारी केली होती. पहिल्या डावात द्विशतक झळकाविणाऱ्या कॉन्वेने दुसऱ्या डावात 139 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 100 धावा झळकाविल्या. तर कर्णधार लॅथमने 130 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 101 धावा केल्या. लॅथमने पहिल्या डावात 137 धावा झळकाविल्या होत्या. विल्यम्सन आणि रचिन रवींद्र या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 72 धावांची भागिदारी केली. विल्यम्सनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 40 तर रचिन रवींद्रने 23 चेंडूत 4 षटकारांसह नाबाद 46 धावा झोडपल्या. चहापानानंतर तासभराच्या कालावधेने न्यूझीलंडने आपला दुसरा डाव 2 बाद 306 धावांवर घोषित करुन विंडीजला 462 धावांचे आव्हान दिले. विंडीजने दुसऱ्या डावात 16 षटकात बिनबाद 43 धावा जमविल्या आहेत. किंग 7 चौकारांसह 37 तर कॅम्पबेल 2 धावांवर खेळत आहेत.
कॉन्वे-लॅथम यांचा धडाका
या कसोटी मालिकेत कॉन्वेने 6 डावात 75.3 धावांच्या सरासरीने 452 धावा जमाविल्या आहेत तर लॅथमने 6 डावात 71.1 धावांच्या सरासरीने 427 धावा केल्या आहेत. या कसोटीमध्ये लॅथम आणि कॉन्वे यांनी दोन्ही डावात 515 धावांची भागिदारी करण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडतर्फे डफी सर्वात यशस्वी गोलंदाज या मालिकेत ठरला आहे. या शेवटच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 4 गडी बाद केले आहेत. तर या मालिकेत त्याने आतापर्यंत 17.3 धावांच्या सरासरीने 18 गडी बाद केले आहेत.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड प. डाव 8 बाद 575 डाव घोषित, विंडीज प. डाव सर्वबाद 420 (हॉज नाबाद 123, किंग 63, कॅम्पबेल 45, अॅथनेझ 45, ग्रीव्ह्स 43, अवांतर 36, डफी 4-86, एजाझ पटेल 3-113, मिचेल रे 2-89, मिचेल 1-9), न्यूझीलंड दु. डाव 54 षटकात 2 बाद 306 डाव घोषित (लॅथम 101, कॉन्वे 100, विल्यम्सन नाबाद 40, रचिन रवींद्र नाबाद 46, अवांतर 19, हॉज 2-80), विंडीज दु. डाव 16 षटकात बिनबाद 43 (किंग खेळत आहे 37, कॅम्पबेल खेळत आहे 2).
Comments are closed.