सांगली जिह्यात राष्ट्रवादी काँगेसने गड राखले
जिह्यातील आठ नगरपरिषदांचे निवडणूक निकाल आज जाहीर झाले. आठपैकी दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), एक जागा काँग्रेस, दोन जागा भाजप, शिवसेना (शिंदे गटाने) दोन आणि तासगावची एक जागा माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या स्थानिक स्वाभिमानी आघाडीने जिंकली. या निकालानंतर सर्वच ठिकाणी प्रचंड जल्लोष करण्यात आला.
सांगली जिह्यातील जत, आटपाडी, ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, शिराळा आणि विटा या आठ नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. तीन तासांत सर्व निकाल हाती आले.
सांगली जिह्यात नगरपरिषद निवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे लागला. ईश्वरपूर आणि आष्टा या दोन नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या दृष्टीने मोठय़ा प्रतिष्ठेच्या होत्या. त्यांनी हे दोन्ही गड राखत आपली सत्ता कायम राखली. पलूस नगरपरिषदेची सत्ता काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी ताब्यात घेत या मतदारसंघात केवळ आपलीच ताकद आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. तासगावमध्ये विद्यमान आमदार रोहित पाटील यांना धक्का देत माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात ते यशस्वी झाले. विटय़ात गेल्या पन्नास वर्षांची सत्ता हिसकावून घेण्यात आमदार सुहास बाबर यशस्वी ठरले. जत आणि आटपाडी येथे भाजपा विजयी झाली. शिराळा नगरपालिकेत सत्ता मिळविण्यात विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यशस्वी ठरले.
सांगली जिह्यातील सर्वांत जुनी आष्टा नगरपालिका यावेळी ताब्यात घ्यायची, या इराद्याने भाजपा मैदानात उतरली होती. मात्र, अवघ्या दोन जागांवर तिथे त्यांना समाधान मानावे लागले. आष्टा नगरपालिकेवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. विशाल विलासराव शिंदे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी (शरद पवार गट) 23 आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) फक्त एक जागा मिळाली.
ईश्वरपूर नगरपालिकेवरही आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व राहिले. आनंदराव मलगुंडे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गटाला) म्हणजेच आमदार जयंत पाटील यांना 22 जागा, तर भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी (अजित पवार गट) तीन, तर शिंदे गटाला दोन जागा मिळाल्या.
पलूस नगरपालिकेवर काँग्रेसने झेंडा फडकवला. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी ताकदीने सत्ता खेचून आणली. पलूसच्या नगराध्यक्षपदी सौभाग्यवती संजीवनी सुहास पुदाले या विजयी झाल्या. पलूसमध्ये काँग्रेस 15, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चार आणि भाजपाला अवघी एक जागा मिळाली.
विटा नगरपालिकेत माजी आमदार सदाशिव पाटील यांची सत्ता होती. पाटील घराण्याच्या तीन पिढय़ांच्या ताब्यात असणाऱया नगरपरिषदेची सत्ता आमदार सुहास बाबर यांनी खेचून आणली. यावेळी विटय़ात महायुतीमध्येच सामना झाला. शिंदे गट आणि भाजप स्वतंत्रपणे लढले. विटय़ाच्या नगराध्यक्ष म्हणून कमल म्हेत्रे या विजयी झाल्या. शिंदे गटाला 22, तर भाजपाला अवघ्या चार जागा मिळाल्या.
आटपाडी नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक होती. येथेही महायुतीत सामना रंगला. या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून शिक्षक सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेले भाजपाचे यु. टी. जाधव निवडून आले. आटपाडीत भाजपाला पाच जागा मिळाल्या आहेत. तर, शिंदे गटाला आठ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीला एक जागा मिळाली.
जत नगरपालिका निवडणुकीत भाजपने सत्ता हस्तगत केली. एकूण 11 जागांवर भाजपा विजयी झाले. काँग्रेसला आठ जागा मिळाल्या. अपक्ष एक आणि राष्ट्रवादी (अजित पवार गटाला) तीन जागा मिळाल्या. नगराध्यक्षपदाचे भाजपाचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी हे मोठय़ा मताधिक्क्याने विजयी झाले.
तासगाव नगरपरिषदेची सत्ता कायम राखण्यात माजी खासदार संजयकाका पाटील यांना यश आले. स्थानिक स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पाटील यांच्याशी त्यांचा सामना झाला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांच्या आघाडीच्या विजया बाबासाहेब पाटील या विजयी झाल्या. यावेळी फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली. फेरमतमोजणीतून विजया पाटील या 66 मताधिक्क्याने विजयी झाल्या. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विकास आघाडीला 13 आणि राष्ट्रवादी (शरद पवार गटाला) 11 जागा मिळाल्या.
कडक बंदोबस्तात मतमोजणी
आज सकाळपासून आठ ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात ही मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच, अनेक ठिकाणी प्रचंड जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
ईश्वरपुरात भाजपसह मित्रपक्षांचा करेक्ट कार्यक्रम
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या उरुण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार जयंत पाटील यांनी नगराध्यक्षपद व 22 नगरसेवक भरघोस मतांनी निवड़ून आणत भाजप मित्रपक्षांचा करेक्ट कार्यक्रम केला. विजयानंतर जयंत पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण केली.
आजच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्षपदासह 23 जागा निवडून आल्या, तर भाजप 3, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 3, शिंदे गटाला 2 जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या आनंदराव मलगुंडे यांना एकूण 26 हजार 626 मते मिळाली, तर विरोधातील भाजपच्या विश्वनाथ डांगे यांना 19 हजार 297 मते मिळाली.
विजयी उमेदवार ः नगराध्यक्षपदी आनंदराव मलगुंडे. नगरसेवक ः सचिन कोळेकर, सुप्रिया पाटील, लता कुर्लेकर, संग्राम बबनराव पाटील, शुभांगी शेळके, खंडेराव जाधव, विद्या पवार, अजित पाटील, अरुणादेवी पाटील, सतेज पाटील, पुष्पलता खरात, लिलाचंद रायगांधी, पल्लवी नागे, आनंदराव पवार, सुभाष सूर्यवंशी, रेखा जाधव, सचिन हांडे, सविता पाटील, जरिना पुणेकर, शिवाजी जाधव, जावेद मोमीन, मनीषा कुरळपकर, कांचन कोळेकर, स्वरुप मोरे, सुनील मलगुंडे, अनिता ओसवाल, राजवर्धन पाटील, सुवर्णा पाटील, संध्या कांबळे, संदीप माने.
Comments are closed.