अमेरिका, कॅनडामध्ये ‘सुपर फ्लू’चा फैलाव, नव्या महामारीची भीती

2025 हे वर्ष सरत असताना अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनसमोर सुपर फ्लूचे संकट उभे राहिले आहे. हा आजार हळूहळू महामारीचे रूप तर धारण करणार नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या जगभरात ‘सुपर फ्लू’ या नावाने ओळखल्या जाणाऱया एका नवीन विषाणूने खळबळ उडवून दिली आहे.

हा इन्फ्लूएंझा विषाणूचा बदललेला प्रकार असून त्याला शास्त्रज्ञांनी ‘सबक्लेड के’ असे नाव दिले आहे. सध्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये त्याचा वेगाने प्रसार होत आहे. ग्लासगो सेंटर फॉर व्हायरस रिसर्चचे प्राध्यापक एड हचिन्सन यांनी सांगितले की, ‘सुपर फ्लू’ या आजाराची अमेरिकेत अनेकांना लागण झाली आहे. त्यापैकी बहुतांश लोक या आजारातूनही बरेही झाले आहेत, परंतु त्याचा वाढता प्रसार रोखण्यासाठी वैद्यकीय विभागाला अपयश येत आहे.

‘सुपर फ्लू’ची लक्षणे कोणती?

  • ‘सुपर फ्लू’ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये अचानक जास्त ताप येणे, प्रचंड थकवा जाणवणे, डोकेदुखी वाढणे, कोरडा खोकला येणे, सतत घसा खवखवणे, भूक न लागणे, पोट दुखणे, मळमळ आणि उलटी होणे, नाक वाहणे किंवा बंद होणे, सतत शिंका येणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात.
  • कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये हीच लक्षणे हळूहळू दिसून येत होती, परंतु ‘सुपर फ्लू’मध्ये ताप, अंगदुखी आणि थंडी वाजणे अशी सर्व लक्षणे एकदम तीव्रतेने जाणवतात. श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, गोंधळल्यासारखे वाटणे, सतत उच्च ताप किंवा तीव्र डिहायड्रेशन यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही तज्ञांनी केले आहे.

Comments are closed.