बिग बॉस तेलुगू 9: कोण आहे कल्याण पडाला? लष्करातून थेट बिग बॉसच्या विजेतेपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास – Tezzbuzz
तेलुगू टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामान्य व्यक्तीने नामांकित सेलिब्रिटी स्पर्धकांना मागे टाकत बिग बॉस तेलुगू 9 ची ट्रॉफी पटकावली आहे. सामान्य विरुद्ध सेलिब्रिटी या थीमवर आधारित या सीझनमध्ये कल्याण पडालाने केवळ विजेतेपदच नाही, तर लाखो प्रेक्षकांची मनेही जिंकली. ग्रँड फिनालेच्या रात्री कल्याणच्या नावाची घोषणा होताच इतिहास रचला गेला.
नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni)यांच्या सूत्रसंचालनाखाली पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये कल्याण पडालाला विजेत्याची ट्रॉफी, 35 लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि एक नवी एसयूव्ही देण्यात आली. सुरुवातीला बक्षीस रक्कम 50 लाख रुपये होती. मात्र, स्पर्धक पवनने अंतिम फेरीपूर्वीच 15 लाख रुपये स्वीकारत शोमधून एक्झिट घेतली. या सीझनमध्ये तनुजा पुट्टास्वामी उपविजेता, तर पवन दुसरा उपविजेता ठरला.
कल्याणचे नाव विजेता म्हणून जाहीर होताच त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. स्टेजवर उपस्थित असलेल्या त्याच्या पालकांच्याही डोळ्यांत अभिमान आणि आनंद दिसून आला. हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरला. यावेळी नागार्जुन अक्किनेनी यांनी कल्याणच्या संयम, शिस्त आणि प्रामाणिक खेळाचे विशेष कौतुक केले.
आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील रहिवासी असलेला कल्याण पडाला मध्यमवर्गीय कुटुंबात वाढला. लहानपणापासूनच फिटनेस, खेळ आणि शिस्तीची आवड असल्यामुळे त्याने भारतीय सैन्यात प्रवेश केला आणि देशसेवेचे स्वप्न पूर्ण केले. सैन्यातील अनुभवामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक मजबूत झाले, जे बिग बॉसच्या घरातही ठळकपणे दिसून आले.
सैन्यसेवा पूर्ण केल्यानंतर कल्याणने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस अग्निपरीक्षा या डिजिटल रिएलिटी शोमधून त्याला पहिली ओळख मिळाली. त्याच्या साधेपणा आणि जिद्दीमुळे प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि त्याच जोरावर त्याने बिग बॉस तेलुगू 9 मध्ये थेट प्रवेश केला.शोदरम्यान कल्याणने वाद-विवादांपासून दूर राहत आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. त्याचे शांत, शिस्तबद्ध वर्तन आणि संयमी स्वभाव प्रेक्षकांना विशेष भावले. यामुळेच संपूर्ण सीझनभर त्याला भरभरून पाठिंबा मिळाला.
आज कल्याण पडालाची सोशल मीडियावरही प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तो ‘सोल्जर पवन कल्याण’ या नावाने ओळखला जातो आणि त्याला लाखो फॉलोअर्स आहेत. तसेच तो तेलुगू सुपरस्टार पवन कल्याणच्या फॅन क्लबशीही जोडलेला आहे. सामान्य व्यक्तीने जिद्द, शिस्त आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर मिळवलेला हा विजय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Comments are closed.