AI cooking suggestions: फ्रिज उघडताच प्रश्न पडतो “आज काय बनवायचं?” आता फ्रिजमध्ये काय ठेवलंय बघून रेसिपी देणार ChatGPT
घरात स्वयंपाक करायची वेळ आली की सगळ्यात मोठा गोंधळ एका प्रश्नाचा असतो, आज नेमकं काय बनवायचं? कधी फ्रिज भरलेला असतो, तर कधी दोन चारच वस्तू उरलेल्या असतात. पण पदार्थ जास्त असो वा कमी, नेहमीच डोक्यात प्रश्न फिरत राहतो. अशा वेळी आता तुमची ही अडचण AI म्हणजेच चॅटजीपीटी सोडवू शकतो. (chatgpt recipe suggestion from fridge items)
चॅटजीपीटी तुमचा फ्रिज स्वतः उघडून पाहू शकत नाही. मात्र तुम्ही फ्रिजमध्ये काय आहे ते लिहून सांगितलं किंवा फ्रिजचा फोटो दिला, तर त्या माहितीच्या आधारावर तो योग्य रेसिपी सुचवतो. म्हणजेच तुमच्या घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंवरून काय बनवता येईल, याचं उत्तर काही सेकंदात मिळू शकतं.
उदाहरणार्थ, तुम्ही चॅटजीपीटीला सांगितलं की फ्रिजमध्ये टोमॅटो, कांदा, अंडी आणि चीज आहे. तर तो लगेच सांगतो की यापासून ऑमलेट, अंडा भुर्जी, चीज पोळी रोल किंवा टोमॅटो कांदा भाजी बनवता येईल. फक्त पदार्थाचं नावच नाही, तर झटपट आणि सोप्या पद्धतीची रेसिपीही तो सुचवतो.
चॅटजीपीटी आधीपासून उपलब्ध असलेल्या माहितीवरून पदार्थांचा मेळ लावतो. कोणते पदार्थ एकत्र वापरले जातात, कोणत्या वस्तूपासून काय तयार होऊ शकतं, हे तो समजून घेतो. अंडी आणि कांदा असतील तर भुर्जी, पोळी आणि चीज असतील तर चीज रोल, टोमॅटो आणि कांदा असतील तर कोशिंबीर किंवा चटणी अशी लॉजिकवर आधारित माहिती तो देतो.
याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळ वाचतो. अनेकदा गॅस कमी असतो, वेळ नसतो किंवा काही विशिष्ट पदार्थ घरात नसतात. अशा वेळी तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता की माझ्या फ्रिजमध्ये फक्त बटाटा, कांदा आणि दही आहे, दहा मिनिटांत काय बनवता येईल? किंवा अंडी नाहीत, झटपट नाश्ता सुचवा. तुमच्या अटी लक्षात घेऊन चॅटजीपीटी योग्य पर्याय देतो.
आता तर फोटो ओळखण्याच्या सुविधेमुळे काम अजून सोपं झालं आहे. तुम्ही फ्रिजचा किंवा भाजीपाला ठेवलेल्या टोपलीचा फोटो दिला, तरी AI त्या फोटोमधल्या वस्तू ओळखून त्यावर आधारित रेसिपी सुचवतो. म्हणजे हे बटाटे आहेत, यापासून काय बनवता येईल, असा प्रश्न विचारला तरी उत्तर मिळू शकतं.
महत्त्वाचं म्हणजे चॅटजीपीटी तुमचा फ्रिज पाहत नाही, तुमचा वैयक्तिक डेटा तपासत नाही. तुम्ही जे सांगता किंवा दाखवता, त्यावरच तो विचार करतो. त्यामुळे घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यावरून स्वयंपाकाची कल्पना मिळवण्यासाठी हा एक सोपा आणि उपयोगी पर्याय ठरत आहे. रोजचा प्रश्न असलेला “आज काय बनवायचं?” याचं उत्तर आता तंत्रज्ञान देऊ लागलं आहे.
Comments are closed.