शुबमन गिल टी20 संघातून बाहेर का झाला? निवड समितीच्या बैठकीतलं खरं कारण आलं समोर!

आशिया कप 2025 साठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हा शुबमन गिलचे संघात पुनरागमन झाले. या कमबॅकसोबतच गिलला संघाचा उपकर्णधार देखील बनवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. याच कारणामुळे टी20 वर्ल्ड कप 2026 च्या संघातून गिलला डच्चू देण्यात आला. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या (Team Management) या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गिलला अचानक टी20 संघातून का बाहेर काढले गेले, यामागची खरी कहाणी आता हळूहळू समोर येत आहे.
रिपोर्टनुसार, निवड समितीच्या बैठकीपूर्वी शुबमन गिलचे टी20 संघातील स्थान निश्चित मानले जात होते. मात्र, बैठकीत 3 निवडकर्त्यांचे असे मत होते की, खराब फॉर्म पाहता गिलचा टी20 वर्ल्ड कप संघात समावेश केला जाऊ नये. यामुळे गिलच्या अडचणीत वाढ झाली. याच रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे शुभमन गिलला पाठिंबा (Back) देत होते, परंतु बहुमताचा कौल विरोधात गेल्यामुळे गिलला संघातून बाहेर पडावे लागले. त्यांच्या जागी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ईशान किशनला संघात संधी मिळाली आहे. दरम्यान, सलामीवीर म्हणून अभिषेक शर्माचा जोडीदार म्हणून संजू सॅमसनचे नाव आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
आता शुबमन गिल पंजाबकडून विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत गिल मोठी खेळी करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विजय हजारे ट्रॉफीनंतर शुबमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) मालिकेचा भाग असेल, जिथे तो पुन्हा एकदा कर्णधारपद भूषवताना दिसेल. आपल्या नेतृत्वाखाली पहिली वनडे मालिका जिंकण्याचा शुबमन गिलचा प्रयत्न असेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएल 2025 पूर्वी गिलची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असेल.
Comments are closed.