अजित पवार गटाला महापालिकेसाठी मिळेनात उमेदवार, भाजपने टाकल्याने पवारांची तारेवरची कसरत

भाजपने पुण्यात महापालिका निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती तोडत मैत्रिपुर्ण लढतीची घोषणा करत अजित पवार गटाला सुरूंग लावला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला अनेक प्रभागांसाठी उमेदवार मिळत नसल्याचे मुलाखतींमधून समोर आले आहे. त्यामुळे अजित पवारांची सत्तेसाठी धडपड सुरू असून काँग्रेसला आघाडीसाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा जोर धरत आहे.
अजित पवार गटाकडून पालिकेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. शहरातील सर्व प्रभागांमधून सुमारे ७११ इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आले होते. रविवारी बारामती हॉस्टेल येथे सकाळी ७ वाजल्यापासून रात्री साडेदहा – अकरा वाजेपर्यंत अजित पवार यांनी स्वत: इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे, माजी अध्यक्ष दीपक मानकर, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे रशिद शेख, मनसेच्या माजी नगरसेविका स्मिता शिंदे, माजी नगरसेवक मिलिंद काची, श्वेता चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
स्वतः अजित पवार यांनी या मुलाखती घेतल्या. मात्र, अनेक प्रभागांसाठी उमेदवांनी हजेरीच लावली नसल्याचे समोर आले. विशेषत: सिहंगड रस्ता परिसरातील प्रभागांमध्ये शुन्य इच्छुक असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी इतर पक्षातदेखील नाराज असतात असे सांगत भाजपमधील नाराजांना संधी देणार असल्याचे संकेत दिले. एकीककडे हुकमी शिलेदार भाजप गळाला लावत असून अजित पवार गटाची परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. त्यामुळे अजित पवार आता पुढे काय करणार हे पाहणे जरूरीचे ठरणार आहे.
अजित पवारांचा काँग्रेसला प्रस्ताव
भाजपने दुर केल्यानंतर एकीकडे पडलेल्या अजित पवार गटाचा सत्तेसाठी केविलवाणा प्रयत्न सुरू झाला आहे. शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आघाडीबाबत सकारात्मक संकेत मिळालेले नाहीत. वरिष्ठ नेत्यांकडून चर्चा सुरू असल्या तरी स्थानिक पातळीवर मतभेद कायम आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी काँग्रेससोबत आघाडीचा पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे. त्यांनी पुण्याची जबाबदारी असलेले आमदार सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधून महापालिका निवडणुकीसाठी आघाडीचा प्राथमिक प्रस्ताव दिल्याची माहिती असून, याला सतेज पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

Comments are closed.