भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
यवतमाळ : राज्यातील नगरपालिका निवडणूक निकालात भाजप महायुतीने घवघवीत यश मिळवलं असून भाजपचा हा विजय पैशांचा, मतखरेदीचा असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तब्बल 15 हजार कोटी रुपयांची उधळण तिन्ही पक्षाकडून निवडणुकीत झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एकीकडे ही निवडणूक पैशाच्या जोरावर, धनशक्तीच्या जोरावर लढवली आणि जिंकल्याचं बोललं जात आहे. त्यातच, एखाद्या नगरपालिकेत आशादायी चित्र देखील पाहायला मिळत आहे. मोहोळमधील 7 हजारांच्या पगारावर काम करणारी 21 वर्षीय तरुणी नगराध्यक्षपदी विराजमान झाली आहे. तर, यवतमाळमध्ये (Yavatmal) राहायला घर नसल्याने उपहारगृहात झोपणाऱ्या रुग्णसेवकाला लोकांनी निवडून दिलंय.
यवतमाळच्या नेर शहरात राहणारा जांबा रुग्णसेवक म्हणून ओळख असलेला सचिन कराळे हा यवतमाळच्या नेर नगर परिषदेमध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णसेवकास राहायला घर नाही. त्यामुळे, सदैव त्याचा मुक्काम नेरच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा बाजूच्या उपहारगृहातच असतो. मात्र तो कायम लोकांच्या संपर्कात असायचा. आक्रमक भाषा, सडपातळ बांधा आणि लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेला जांबा नेर नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाला. त्याने प्रस्थापित संजय राठोड यांचे निकटवर्तीय शिवसेनेच्या शिंदे गटाचे सुभाष भोयर यांचा पराभव केला.
भाजपने तिकीट नाकारलं, अपक्ष लढला
गेल्या अनेक दिवसापासून जांबा राजकारणात सक्रीय आहे. भाजपसारख्या पक्षात त्याने आपले बहुमूल्य योगदान संघटन कौशल्यासाठी दिले. मात्र, भाजपाने त्याला ऐनवेळी उमेदवारी नाकारली. महायुतीच्या राजकीय घडामोडीत त्याची उमेदवारी ऐनवेळी रद्द झाली. मात्र, कुठल्याही परिस्थितीत लढायचेच हा चंग जांबाने यावेळी बांधला होता. त्यासाठी सर्वसामान्य वंचित घटकातील त्याचे सर्व मित्र पुढे आले आणि नेर नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये त्याची उमेदवारी दाखल करण्यात आली. वार्ड क्रमांक 1 मधून मागील पंधरा वर्षापासून प्रतिनिधित्व करणारे शिंदे गटाचे सुभाष भोयर यांच्याशी त्याची थेट लढत झाली. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई होती. त्यामुळे सर्वसामान्य गरीब माणसांनीच जांबाची ही निवडणूक हाती घेतली होती. अखेर या तुल्यबल लढतीत शिंदे सेनेच्या सुभाष भोयर या तगड्या प्रस्थापित राजकीय नेत्याला सर्वसाधारण जांबाने धूळ चारली आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला. जांबाने विजयाचा गुलाल उधळला.
हेही वाचा
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
आणखी वाचा
Comments are closed.