एमएस धोनी नसता तर माझं करिअर अधिक चांगलं झालं असतं.., अमित मिश्रांचा खळबळजनक खुलासा समोर
अमित मिश्रा (Amit Mishra) यांच्याबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की, जर एमएस धोनी कर्णधार (MS Dhoni) नसता तर त्यांना अधिक यश मिळालं असतं. अनेकदा असा दावा केला जातो की, धोनीचा आर. अश्विन आणि रवींद्र जडेजावर अधिक विश्वास होता, ज्यामुळे मिश्रांच्या संधी कमी झाल्या. आता या विषयावर अमित मिश्रांनी स्वत: खुलासा केला आहे.
मेन्स एक्सपी’शी बोलताना अमित मिश्रा म्हणाले, लोक म्हणतात की धोनी नसता तर मला अधिक यश मिळालं असतं, पण कोणास ठाऊक, जर धोनी नसता तर कदाचित मी कधी भारतीय संघात आलोच नसतो. मी त्यांच्याच नेतृत्वाखाली संघात आलो आणि वारंवार पुनरागमन करत राहिलो. ते माझ्या खेळाशी सहमत होते, म्हणूनच मला संधी मिळत राहिली. गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.
अमित मिश्रा यांच्या करिअरमध्ये त्यांना सातत्याने संधी मिळाल्या नाहीत, हे वास्तव आहे. तरीही जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्यांनी आपली चमक दाखवली. त्यांच्या नावावर 22 कसोटीत 76 विकेट्स, 36 वनडेत 64 विकेट्स आणि 10 टी-20 सामन्यात 16 विकेट्स आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना धोनीने त्यांना नेहमीच पाठिंबा दिला, असेही मिश्रांनी नमूद केले. त्यांनी एक किस्सा सांगितला. मला धोनीचा पूर्ण पाठिंबा मिळाला. जेव्हा जेव्हा मी प्लेइंग इलेवनमध्ये होतो, त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केलं. माझ्या शेवटच्या वनडे मालिकेवेळी (न्यूझीलंडविरुद्ध) धोनी कर्णधार होता. तो सामना चुरशीचा होता. आम्ही 260-270 धावा केल्या होत्या. मी जेव्हा गोलंदाजीला आलो, तेव्हा मी फक्त धावा रोखण्याचा प्रयत्न करत होतो, विकेट घेण्याचा नाही.
ते पुढे म्हणाले, मी माझ्या नैसर्गिक शैलीत गोलंदाजी करत नव्हतो. तेव्हा धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला की, ‘जास्त विचार करू नकोस आणि तुझी नैसर्गिक गोलंदाजी कर.’ मी तसंच केलं आणि मला विकेट मिळाली. धोनीने मला सांगितलं होतं की, ‘ही तुझी खरी गोलंदाजी आहे, अशीच करत राहा.’ तो स्पेल गेम चेंजर ठरला होता.
Comments are closed.