कोकण रेल्वेवर दरवाढीचा भुर्दंड लादू नका; 40 टक्के अंतराचा अधिभार रद्द करा; प्रवासी संघटनांची रेल्वे मंत्रालयाकडे मागणी

मेल-एक्सप्रेसच्या तिकीट दरवाढीमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दरवाढीला तीव्र विरोध केला जात आहे. कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर दरवाढीचा भुर्दंड लादू नका, आधीपासून अन्यायकारक पद्धतीने आकारला जाणारा 40 टक्के अंतराचा अधिभार तातडीने रद्द करा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
देशातील इतर प्रवाशांच्या तुलनेत कोकण रेल्वेच्या प्रवाशांना समान अंतरासाठी 40 टक्के जास्तीचे भाडे द्यावे लागत आहे. कोकण रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीवर 40 टक्के अंतराचा अन्यायकारक अधिभार आकारला जात आहे. बांधकाम खर्च अधिक असल्याने अधिभार लावल्याचे सुरुवातीला प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र 33 वर्षे उलटून गेल्यानंतरही अधिभार ‘जैसे थे’ ठेवला आहे. तो रद्द करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत रेल्वे मंत्रालयाने नव्या तिकीट दरवाढीच्या अंमलबजावणीतून कोकण रेल्वेला वगळणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी दिली. रेल्वे मंत्रालयाने मेल-एक्सप्रेसच्या तिकीट दरात प्रतिकिलोमीटर 1 ते 2 पैशांची वाढ केली आहे. कोकण रेल्वे मार्गावरून सिंधुदुर्गपर्यंतचा प्रवास करणाऱया प्रवाशांनाही दरवाढीचा फटका बसणार आहे. कोकण रेल्वेची हद्द रायगड जिह्यातील रोह्यापासून कर्नाटकातील ठोकूरपर्यंत आहे. या हद्दीत प्रवास करणाऱया प्रवाशांकडून 40 टक्के वाढीव अंतराचे भाडे आकारले जात आहे. नव्या दरवाढीने मोठा आर्थिक भुर्दंड बसणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
कोकण विकास समितीचा अधिभाराला तीव्र विरोध
कोकण रेल्वेवर प्रवासी वाहतुकीसाठी 40 टक्के आणि मालवाहतुकीसाठी 50 टक्के अधिभार लागू आहे. अधिभाराला तीव्र विरोध करीत कोकण विकास समितीने रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्डातील अधिकारी, संबंधित राज्यांचे (महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक) मुख्यमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींशी पत्रव्यवहार केला आहे.

Comments are closed.