‘जर-तरची गोष्ट’चे दिग्दर्शक रणजीत पाटील यांचे निधन

‘जर-तरची गोष्ट’ या नाटकाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेते रणजीत पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, रणजीत यांच्यावर कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. रणजीत यांच्या निधनामुळे मराठी कलाकार आणि अनेक रंगकर्मींनी हळहळ व्यक्त करत युवा कलाकारांचा भक्कम आधारस्तंभ हरपल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून रणजीत पाटील हे मराठी मालिका, नाटक तसेच चित्रपट विश्वात सक्रिय होते. तसेच त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून तरुण कलाकारांना प्रोत्साहन दिले होते. अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. रूईया महाविद्यालयातील एकांकिकांच्या दिग्दर्शनाची जबाबदारीदेखील त्यांनी सांभाळली होती. सध्या ते प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ‘जर-तरची गोष्ट’ या नाटकाचे दिग्दर्शन करत होते. दिग्दर्शनाव्यतिरिक्त झी मराठीवरील ‘हृदय प्रीत जागते’ या मालिकेत त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या पात्राचे आणि अभिनयाचे काwतुकही झाले होते.

Comments are closed.